देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर— देवगड येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. बी. वाळके यांच्या हस्ते झाले. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा १८४२ प्रकरणांपैकी एकूण ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून १ कोटी १० लाख ८३ हजार ५४८ रूपये इतकी वसुली झाली.
तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड तालुका वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड देवानंद गोरे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अविनाश माणगावकर,ऍड. प्रकाश बोडस,ऍड. लक्ष्मीकांत नाथगोसावी, ऍड.इंद्रनील ठाकुर,ऍड. कौस्तुभ मराठे, ऍड. प्रसाद करंदीकर, ऍड. अभिषेक गोगटे, ऍड.आशिष लोके,ऍड.आरती खाडीलकर, ऍड.मैथिली खोबरेकर, ऍड. कालेकर, ऍड.जाधव, ऍड. देवगडकर, ऍड.साटम, ऍड. सिद्धेश माणगावकर,ऍड.सांगळे यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील एकूण २८९ दावे ठेवण्यात आले होते. त्यातील ५४ खटले निकाली काढण्यात आले. यातून २६ लाख ४४ हजार ९०१ रूपये इतकी वसुली झाली. तर बँक, दूरसंचार विभाग, ग्रामपंचायत विभाग, नगरपंचायत, महावितरण यातील १५५३ इतकी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण ८४ लाख ३८ हजार ६४७ रूपये इतकी वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून ऍड.अविनाश माणगावकर यांनी काम पाहिले.












