कणकवली (प्रतिनिधी): गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अटक करण्यात आलेल्या कलमठ येथील अल्ताफ जमील अत्तार (२३) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. १ तथा विशेष न्यायाधीश श्रीमती एस. एस. जोशी यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला. संशयिताच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळालेल्या माहितीच्या आधारे २६ ऑक्टोबर रोजी शहरातील एका हॉटेलजवळ दोघा संशयितांना १ किलो ११० ग्रॅमचे एकूण ६५ पाऊच विक्रीसाठी आणलेले असताना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत आरोपी अल्ताफ याने सदरची गांजा पाकिटे विक्रीसाठी आणली होती, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी अल्ताफ अत्तार याच्या घराची झडती घेतली असताना घरात किचनच्या ओट्याखाली ४० ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर आरोपीला अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली असता आरोपीच्यावतीने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर झालेल्या सुनावणीअंती ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासात ढवळाढवळ करू नये, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.