अमर जवान क्रिएशन् ची नवीन निर्मिती
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित प्रा.शेखर गवस दिग्दर्शित मालवणी नाटक
कणकवली (सत्यवान गावकर) : मालवणी नाटक म्हटले की डोळ्यांसमोर येतात साता समुद्रा पार मालवणी भाषेला नेऊन ठेवणारे लेखक वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर सध्या मालवणी भाषेला फार चुकीचे दिवस आले आहेत. अगदी टीव्ही वरील मालिकांचा टी आर पी वाढवणारी मालवणी भाषा पुन्हा एकदा तिचा आस्वाद आपल्या सिंधुदुर्गात घेण्यासाठी लेखक गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतील आणि दिग्दर्शक प्रा. शेखर मनोहर गवस यांच्या दिग्दर्शनातून निर्माते जगदीश लाडू गवस यांच्या अमर जवान क्रिएशन निर्मित “कोर्टात खेचिन” हे नाटक 11 इरसाल मालवणी कलाकारांच्या संच्यात रंगभूमी वर आले असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग दीड ते दोन हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत मसुरे भरतेश्वर मंदिर श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी वर्ष 66वे उत्सवानिम्मित देऊळवाडा येथे झाला.
नाटक पाहत असताना आपल्याच गावातील आस पास जवळच्या व्यक्तींना भेटल्याचे जणु भासत होते. नाटकाला सुरुवात होताच रंगमंचावर खाकी वर्दीतला इन्स्पेक्टर येतो बराच वेळ वाट पाहतो मोबाईल वाजत आहे कोणीही आसपास जवळपास नसल्याकारणाने कॉल उचलतो एवढ्यात त्याचे सीनियर निंबाळकर येतात आणि इन्स्पेक्टर सावंत ची शाळाच घेतात बरीच चर्चा झाल्या नंतर वैभववाडी मध्ये एकही गुन्हा न घडल्याचे निदर्शनास येते हा सरपंच फार शातीर आहे त्याच्याभोवती सापळा रचायला हवा अशी ऑर्डर देऊन इन्स्पेक्टरला रवाना करतात. यामध्ये साकारणारे इन्स्पेक्टर सावंत म्हणजेच साईनाथ सावंत आणि डीवायएसपी निंबाळकर साकारणारे जगदीश गवस यांनी खाकी वर्दीतल्या पात्रांना कडक सॅल्यूट ठोकला.यामध्ये प्रमुख भूमिकेत कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावचा सुपुत्र सत्यवान गावकर यांनी साकारलेली दाजींची भूमिका मनात घर करून गेली त्यांनी घातलेले मालवणी गाऱ्हाणे प्रेक्षकांना “होय महाराजा” म्हणण्यास भाग पाडून गेले. अख्खा गाव सांभाळत असताना गावच्या विकासासाठी करत असलेली धडपड दहा वर्षे सरपंच पद गाजवत गावाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याकरिता चाललेले प्रयत्न पदरात अपंग मुलगा बायको आणि एक भाडेकरू असा परिवार गावच्या विकासासाठी गावातील होतकरू तरुणांना कबड्डीचा संघ काढून देऊन त्यांना नावा रूपाला आणण्याचा प्रयत्न करत असताना कधीही विजयी न झालेला त्यांचा कबड्डी संघ व त्या खेळाडूंच्या हातून घडणारी नकळत चूक आणि त्यांच्यावर निघणारा दाजींचा राग आणि अभिनयाचा उत्तम टाइमिंग पोट धरून हसायला भाग पाडणारा होता. सौरभ जाधव, ईशान साठविलकर, वेदांत जंगले यांना पाहताना प्रो कबड्डी लीग पाहत असल्याची अनुभूती झाली. ते सगळं पाहत असताना नाटकातील लेखकांनी लिहिलेले मालवणी शब्द आणि दिग्दर्शकांनी केलेले दिग्दर्शन या गोष्टींनी नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. लक्ष्मी साकारणारी मनस्वी जाधव म्हणजेच दाजींची बायको अपंग असून देखील ते सगळं दुःख उराशी कवटाळून दाजींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून गावच्या विकासासाठी हातभार लावणारी तेवढीच समंजस पण थोडीशी चिडकी अशी व्यक्तिरेखा उत्तमरीत्या साकारली. दाजींचा मुलगा गोविंदा ही भूमिका साकारणारा जयेश घाडीगांवकर खरंच मतिमंद अपंग आहे की काय असं त्याचा अभिनय पाहून काही क्षणांसाठी वाटलं वयाने मोठा परंतु त्याचं वागणं अगदी लहान मुलासारखं त्याच्या त्या निरागसपणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आणि प्रत्येक कामामध्ये घुटमळत प्रश्न विचारण्या आधीच त्यापुढील प्रश्नावली आपल्या डायरीत लिहून ठेवणारा दामू आणि या सगळ्या गोंधळात त्याला पडणारे फटके प्रेक्षकांना लोटपोट करून गेले. सख्खा मुलगा नसून देखील सख्या मुलाप्रमाणे दाजींचे काळजी घेणारा त्यांच्यासाठी उठ – बस करणारा गावचा ग्रामसेवक दामू सध्या कोकणात कमी दिसेल मात्र या दामुने म्हणजेच शुभम जाधवने ते लिलया पेलले. मग नाटक असो की सिरीयल व्हिलन हा हवाच असतो. पंचक्रोशीतील गुन्हेगारीचा तक्ता पाहून वैभववाडीत गुन्हे घडत नाही परंतु वैभववाडीत सरपंचाच्या हातून गुन्हा घडावा यासाठी डी वाय एस पी यांनी पाठवलेले इन्स्पेक्टर सावंत यांनी समस्त प्रेक्षकांना घाम फोडला ही भूमिका साईनाथ सावंत यांनी रुबाबात गाजवली आणि त्यांच्या कामात लुडबुड करणारे हवालदार कदम म्हणजेच विठ्ठल गावकर यांच सॉरी सर चिमुकल्यांच्या तोंडी रुजलं चुमुकले सॉरी सर ओरडू लागले एका अभिनेत्याची हीच पोचपावती. प्रश्न निर्माण झाला की या सगळ्या वरती उपाय आत्महत्या मग आत्महत्या करायची कोणी “गाव झोळून इलो आणि हुंबर्या वर आपटान मेलो” अशी परिस्थिती निर्माण झाली असताना गावातील गरीब घरातील दमा असलेला शांतू याच्या मुलीवर बळजबरी झाल्याची तक्रार घेऊन शांतू रडत आपल्या मुलीसह दाजींच्या घरी येतो सगळी चर्चा झाल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत तोडगा काढतो की तुझा मुलगा गोविंदा आणि शांत ची मुलगी माली तिचं लग्न लावून काही कालांतराने मालीला जाळून मारायचे म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरातून आत्महत्याच प्रकरण असल्याकारणाने प्रतिष्ठा मिळेल केसच वजन वाढेल मला प्रमोशन मिळेल आणि तुमचं कोर्टात जान टळेल हा प्रसंग पाहत असताना सरपंचा प्रति म्हणजेच दाजींप्रती असणारे गावातील लोकांचे प्रेम आणि गावाप्रती असणार एका सरपंचाचे प्रेम आणि हरवत चाललेल्या माणसातील माणुसकीचे दर्शन घडलं शांतू साकारणारे जगदीश गवस आणि माली साकारणारी प्रणाली म्हसकर सर्वांच्याच लक्षात राहिली. आजपर्यंत गावासाठी चांगलं ते चिंतन करणारा हातून मुंगीलाही न मारणारा व्हाईट कॉलर सरपंच त्याचा कबड्डी संघ त्याचा गाव मोठ्या विळख्यात सापडला होता आणि हतबल झालेला गाव हतबल झालेला सरपंच ढसाढसा रडू लागल्यावर हा प्रसंग पाहताना प्रेक्षक वर्गाच्याही डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. या नाटकाचे नेपथ्य पाहून घराच्या उंबऱ्यावर बसून नाटक बघत असल्याचा भास झाला. कोकणातील घर जशास तसे उभे केले होते. या नाटकाचे नेपथ्य बाबा सुतार, राजेश फोंडेकर, प्रमोद तांबे, दत्ताराम कुळये, तुषार सावंत यांनी केले होते. मनाला भिडणारे पार्श्वसंगीत शेखर गवस, दयानंद कसालकर यांनी केले. तर पहाटेची सूर्यकिरण पडावीत एवढी सहज प्रकाशयोजना करणारे ऋषिकेश (दादा) कोरडे यांनी केले. वाखाण्याजोगी वेशभूषा / रंगभूषा श्रद्धा परब, प्रमोद तांबे यांनी केली. अशा या दोन अंकी धमाल विनोदी नाटक “कोर्टात खेचिन”… पाहिल्यानंतर आलेल्या मुंबईकराला मुंबईला जाणे नक्कीच कठीण होईल तर मुंबईकराला गावची ओढ लागल्याशिवाय राहणार नाही.
अमर जवान क्रिएशन च्या माध्यमातून नव्यानेच जन्माला आलेल्या या नाटकात मात्र कोकणातील सर्व कलाकारांना घेऊन व्यावसायिकतेच्या दर्जेदार नाटकाची निर्मिती प्रचंड मेहनत घेऊन दिग्दर्शक श्री प्राध्यापक शेखर गवस यांनी लीलया पेलली आहे. नाटक पाहताना कुठेही नवखे कलाकार वावरतात असा अजिबात भास होत नाही हे सर्व श्रेय नाट्यदिग्दर्शक प्राध्यापक शेखर गवस आणि त्यांच्या टीमचे आहे. म्हणूनच “कोर्टात खेचिन” हे नाटक स्वतः याची देही याची डोळा पाहणे रसिकांसाठी एक मेजवानी ठरेल.

















