सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ! सावकारी कायद्यांतर्गत होमगार्डसह दोन महिलांवर मालवणमध्ये गुन्हे दाखल

चौके ( प्रतिनिधी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा खाजगी सावकारीचे अनेक गैरप्रकार गेली अनेक वर्षे बोकाळलेले आहेत. कोरोनानंतरच्या परिस्थितीचा गैरफायदा उठवत पठाणी व्याजदराने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी सावकारी चालली असून त्यातून महिलांच्या छळाचे सर्वाधिक प्रकार होत असल्याचे समोर येत होते. याप्रकरणी पोलीस स्थानकातूनच तक्रारदारांऐवजी सावकारांना पाठींबा मिळत असल्याचेही बोलले जात होते. मागील काही कालावधीत महाराष्ट्र लोकाधिकार समितीने याविरोधात आक्रमक भूमिका घेत महिलांनी अशा अत्याचारांना बळी न पडता तक्रार दाखल करण्याचे आवाहन करत अन्यायग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर मालवणमधील काही महिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यांना न्याय देण्याबाबत पोलीस स्टेशनमधून मुद्दाम टाळाटाळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच गेल्याच आठवड्यात लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ऍड प्रसाद करंदीकर यांनी मालवण पोलीस स्थानकाचे निरीक्षक श्री कोल्हे यांची भेट घेत कारवाई न झाल्यास आंदोलनाची भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार संघटनेने पुढे जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याशी पाठपुरावा करत विषय लावून धरला होता. अखेर आज दोन परप्रांतीय महिलांसह एक अन्य इसम व एका होमगार्डविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बेकायदेशीर व्याजी व्यवहार करणाऱ्या वर्तुळात त्यामुळे खळबळ माजल्याचे समजते.

मालवणमध्ये काही परप्रांतीय महिला दरमहा १० टक्केपेक्षा जास्त व्याजदराने पैसे देत असल्याच्या तक्रारीतून हा गुन्हा दाखल झाला आहे, तर आपल्या होमगार्ड असण्याचा गैरफायदा उठवत या व्याजी पैशाच्या वसुलीसाठी खाकी वर्दीचा वापर केला जात असल्याचेही यातून पुढे येत आहे. पैशाच्या वसुलीसाठी महिलांच्या घरातून गॅससिलेंडर, शेगड्या, घरसामानही उचलले गेले असल्याचा, तसेच खोटे व्यवहार तयार करत महिलांच्या घरी दहशत माजवली जात असल्याचा आरोप मालवणमधील पत्रकार परिषदेत ऍड प्रसाद करंदीकर यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीरपणे केला होता. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ कलम ३९, ४५, ४६ तसेच भारतीय दंड संहिता १८६० कलम ३४, ५०४, ५०६, ५०७ नुसार मालवणमधील होमगार्ड संतोष हिंदळेकर यांच्यासह रुद्राप्पा गौडर, मनिषा गौडर, प्रियांका कुमावत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती प्रसाद करंदीकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!