राज्यात चौथ्या महिला धोरणास हिवाळी अधिवेशनात मंजुरी
बाळाच्या नावा सोबत वडीलांच्या नावा आधी आईचे नाव लावण्याचा झाला निर्णय
खारेपाटण (प्रतिनिधी) : श्रमजीवी संघटनेच्या आई सन्मान मोहिमेस यश मिळले असुन महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी मुलां मुलींच्या नावा मध्ये आईचेही नाव वडिलां सोबत लावण्याचा निर्णय हिवाळी अधिवेशनात नुकताच जाहीर केला.श्रमजीवी संघटना गेल्या चार वर्षांपासुन सरकार दरबारी या मागणी साठी आंदोलन करुन तसेच विविध पध्दतीने पाठपुरावा करीत होती. आई सन्मान मोहिमेअंतर्गत संघटने कडून ठाणे, नाशिक व पालघर जिल्ह्यातील सर्व तहसिलदार आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्या आईच्या नावासह नामफलक भेट देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना या मागणींचे निवेदन देऊन त्यांचे या मागणीकडे लक्ष वेधले. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ४० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे तसेच पाच पंचायात समितीचे ठराव या मागणी साठी झाले असुन या ग्रामपंचायतींनी व पंचायत समितींत्यांनी तसा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवला होता. हे सर्व श्रमजीवी संघटनेच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.आज जरी समाजातील काही व्यक्ती आपल्या नावा मध्ये आईचे नाव लावत असले तरीही अधिकृत पणे सर्व दस्तऐवजांवर आईचे नाव तीच्या मुलांच्या नावात लावण्यासाठी खुप अडचणी येत आहेत. आणि म्हणूनच सर्व मातांचा सन्मान आणि अस्तित्व अबाधित राखण्यासाठी श्रमजीवी संघटनेने आईचे नाव अधिकृत पणे सर्व दस्तऐवजांवर लावण्याची मागणी शासनाकडे लावून धरली होती.
संघटनेने दिं १ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चामधेही ही मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सोबत दि.२८ फेब्रुवारी, २०२३ रोजी झालेल्या शिष्टमंडळ चर्चेमधेही ही मागणी लावून धरण्यात आली.या बाबत शासन लवकरच निर्णय घेईल.असे आश्वासन मा मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते.महाराष्ट्रात चौथ्या महिला धोरणाला शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून हिवाळी अधिवेशनात मुला मुलींच्या नावा सोबत वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याबाबत निर्णय झाल्याचे महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री मा अजित दादा पवार यांनी बारामती येथे बोलताना जाहीर केले.
महाराष्ट्र शासनाने आई सन्मानाचे घेतलेले हे धोरण व केलेला निर्णय या बाबत नुकतेच दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले. या वेळी संघटनेच्या कार्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा उपाध्यक्षा संगीता भोमटे व जया पारधी , तुषार सांबरे आणि रेखा पराड उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या आई सन्मान लढ्यास मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभुमिवर यावर्षी ३ जानेवारी २०२४ या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी संघटनेच्या कार्यक्षेत्रात या महाराष्ट्र शासनाच्या या पुरोगामी निर्णयाबद्दल मोठा जल्लोष साजरा केला जाणार आहे. श्रमजीवी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, अजीतदादा पवार व महिला व बाल विकास मंत्री .आदिती तटकरे यांचे विशेष आभार मानले. असल्याचे श्रमजीवी संघटना- महाराष्ट्रचे प्रदेश सचिटणिस बाळाराम भोईर आणि विजय जाधव यांनी म्हटले आहे.













