साद फाउंडेशन आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ पत्रलेखन-काव्य स्पर्धेत सिद्धी वरवडेकर प्रथम

स्वतःच अस्तित्व सिद्ध करा मर्यादीत राहू नका – रुपाली कदम

कणकवली (श्रेयश शिंदे) : जगात प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे, प्रेम जीवनाच्या सुरुवातीलाही होते. जीवनाच्या नंतरही असेल. मर्यादित न राहता, चाकोरीबाहेर जाऊन विचार करा आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करा असे आवाहन रुपाली कदम यांनी साद फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ या विषयावर बोलताना व्यक्त केलं. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा कणकवली येथील युनिक हॉल येथे संपन्न झाला. साद फाउंडेशन आयोजित ‘माझं व्हॅलेंटाईन’ स्पर्धेत स्पर्धकांनी आपलं ‘व्हॅलेंटाईन’ काव्य तसेच पत्र रूपात मांडलं. यावेळी कवयित्री व गायिका रूपाली कदम, समीक्षक व लेखक अच्युत देसाई, साद फाउंडेशनच्या अध्यक्षा व कुडाळ नगरपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, पंचायत समिती प्रशासन अधिकारी सुगंधा देवरुखकर, साद चे सचिव आणि युनिक अकॅडमीचे संचालक सचिन कोर्लेकर, कवी किशोर कदम, लेखक-कवी श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेच्या माध्यमातून सातवीच्या विद्यार्थ्यांपासून ते साठी पार झालेल्या गृहिणीपर्यंत सर्वच जणांनी आपले विचार पत्र आणि काव्य स्वरूपात मांडले. ते विशेष उल्लेखनीय आणि खास होते. व्हॅलेंटाईन डे निमित्त आयोजित केलेल्या या पत्रलेखन व काव्य स्पर्धेत सिद्धी वरवडेकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर अर्चना परब यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आणि शैलजा पांढरे व दर्शना पाताडे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला तर काशिनाथ वर्देकर, मधुरा गावकर, सिद्धी वंजारे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले.

साद फाउंडेशन ने आयोजित केलेल्या या पत्र लेखन व काव्य स्पर्धेला सर्वच वयोगटातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धकांनी आवडती व्यक्ती, वस्तू, पुस्तक, ठिकाण अशा आपल्या आवडत्या विषयावर लेखन केले होते. परीक्षक अच्युत देसाई यांच्या परीक्षणातून क्रमांक काढून त्यांना ‘एल एम नाईक स्मृतिप्रित्यर्थ’ बक्षीस, प्रमाणपत्र भेट वस्तू देवून तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे देऊन अध्यक्षा गितांजली नाईक आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विजेत्यांसह, उपस्थित कवी व लेखक यांनीसुद्धा काव्य तथा पत्राचे वाचन करण्यात केले तर आपल्या सुमधुर आवाजात गायिका रुपाली कदम यांनी एक गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन कोर्लेकर यांनी आणि सूत्र संचालन प्रा. अपूर्वा गोलतकर तर आभार उद्योजिका वर्षा तळेकर यांनी मानले.

error: Content is protected !!