ॲड विवेक मांडकुलकर यांनी काम पाहिले.
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : हिंब्ज हॉलिडेज प्रा. लि या नावाची कंपनी स्थापन करून मोठ्या रकमेची आमिषे दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या दिनेश बळवंत सकपाळ, राहणार लोअर परेल,मुंबई या संशयिताला जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस जोशी यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर, ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले. संशयिताने हिंब्ज हॉलिडेज प्रा. लि नावाची कंपनी स्थापन करून लोकांना मोठ्या रकमेची आमिषे दाखवून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर चेकद्वारे पैसे स्वीकारून, स्वीकारलेले पैसे परत न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस स्थानक येथे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार संशयितावर भा. दं. वि. कलम ४०६, ४२०, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायदा १९९९ चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी अटक करून सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान संशयिताने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यावरील सुनावणी दरम्यान संशयितातर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.











