पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले. तर कणकवली पत्रकार संघाला पुन्हा एकदा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत या दोन्ही संघांसह स्पर्धेतील अन्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड मैदानावर बुधवारी दिवसभर ही स्पर्धा रंगली. कुडाळ विरुद्ध कणकवली यांच्यातील पहिल्या सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिला उपांत्य सामना सिंधुदुर्गनगरी विरुद्ध कणकवली यांच्यात रंगला. यात कणकवली तालुक्याने विजय संपादन केला. तर दुसरा उपांत्य सामना वेंगुर्ले विरुद्ध सावंतवाडी या संघात रंगला. यात वेंगुर्ले संघाने बाजी मारली. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकार क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या स्पर्धेच्या चषक याच्यासाठी वेंगुर्ले विरुद्ध कणकवली यांच्यात लढत झाली. पहिली फलंदाजी करताना वेंगुर्ले संघाने पाच षटकात ३८ धावा केल्या. जिंकण्यासाठी ३९ धावांचे आवाहन कणकवली संघाला पार करता आले नाही. त्यामुळे त्यांना उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. यापूर्वी दोनवेळा झालेल्या या स्पर्धेत मालवण संघाने बाजी मारली होती. तिसऱ्या वेळी मात्र वेंगुर्ले संघाने बाजी मारत इतिहास रचला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर, गणेश जेठे, मुख्यालय अध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव देवयानी वरसकर, रमेश जोगळे, दाजी नाईक, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, लवू म्हाडेश्र्वर, संजय वालावलकर, गिरीश परब, विनोद परब, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर, तेजस्वी काळसेकर, सतीश हरमलकर, रवी गावडे, प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते.

यावेळी मनीष दळवी यांच्याहस्ते वेंगुर्ले संघाला विजेता चषक आणि रोख ७ हजार ७७७ रुपये, मुकुंद चिलवंत यांच्याहस्ते उपविजेत्या कणकवली संघाला चषक आणि रोख ५ हजार ५५५ रुपये देण्यात आले. मालिकावीर म्हणून वेंगुर्ले संघाचा हर्षल परब यांना ट्रॉफी, शेवटच्या सामन्याचा सामनावीर म्हणून रविकरण परब यांना टी शर्ट, उत्कृष्ट फलंदाज म्हणून कणकवली संघाचा अक्षय पावसकर आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चित्तरंजन जाधव यांना आकर्षक ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला टी शर्ट आणि टोपी आयोजकांच्यावतीने देण्यात आली. यावेळी स्पर्धेला पंच म्हणून लाभलेल्या विवेक जबडे, शेखर परब, समालोचक विवेक परब, गुणलेखक गणेश राऊळ, ध्वनिक्षेपक गोपाळ बांबुळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विनसम मंडळ वागदे यांचे अध्यक्ष अनिल चव्हाण, अमोल चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. या स्पर्धे दरम्यान आ वैभव नाईक, शरद पवार गटाचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन विनोद दळवी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!