खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील वंचितांच्या सर्वांगीण उध्दारासाठी कार्य करणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे सारे जीवन म्हणजे एक धगधगता आणि संघर्षपुर्ण असा जीवनप्रवास आहे. जेव्हा स्रीयांना शिक्षण देणे एकप्रकारे पाप समजले जात होते. तेव्हा ज्योतीबांच्या खांद्याला खांदा लावून समस्त स्री वर्गाच्या जीवनात ज्ञान प्रकाशाचे किरण आणण्यासाठी सावित्रीबाईंनी शेणा मातीचे गोळे अंगावर झेलले. अशा सावित्रीबाईंचे विचारकार्य एकपात्री नाट्य माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचे कार्य युवा समाज कार्यकर्ती संध्या पानस्कर या नेटाने करीत आहेत. नाट्याभिनयाद्वारे सोप्या भाषेत सावित्रीबाईंचे जीवन विचार उलगडून सांगण्यात संघर्ष यात्री सावित्रीबाई हा एकपात्री प्रयोग यशस्वी ठरत आहे. केअरच्या कार्यक्रमातही संध्या यांच्या सादरीकरणाने चांगली प्रशंसा मिळविली. एकपात्री प्रयोग सादरीकरणामधे संध्या यांचे पती संदेश गायकवाड यांची त्यांना साथ राहिली.
केअर संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीत या संस्थेने सामाजिकदृष्ट्या जी संवेदनशिल माणसं जोडण्याचे कार्य केले. त्यांपैकीच संध्या पानस्कर ही माजी विद्यार्थीनी असून ती सामाजिक विषयांवर सक्रीय राहून कार्य करणारी सामाजिक कार्यकर्ती आहे.
कार्यक्रमप्रसंगी संध्या च्या नाट्यकलेविषयी व कार्याविषयी केअरचे विश्वस्त संदिप परब यांनी संक्षिप्त परिचय करून दिला.
केअरचे संस्थापक श्रीनिवास सावंत,अध्यक्ष शरद सावंत,सचिव महेश घाग,खजिनदार आनंद राजु, विश्वस्त रामचंद्र अडसुळे,डाँ.राजेश कापसे ,डाँ.दिनु मँथ्यु, भास्कर काकड, प्रविण दामले ,महेंद्र गमरे इ सर्व विश्वस्त सदस्य यावेळी उपस्थीत होते.













