खारेपाटण किल्ल्यावर प्रथमच शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव नुकतीच उस्ताहात साजरी करण्यात आली. यावेळी खारेपाटण किल्ल्यावर प्रथमच शिवजयंती शिवराज्यभिषेक सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमासह संपन्न झाला. यावेळी शिवजयंती उत्सव समिती खारेपाटण च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खारेपाटण येथील देव केदारेश्वर मंदिर येथून शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात खारेपाटण बाजारपेठेतून खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यावर नेण्यात आली. या मिरवणुकीत लाठी काठी व मर्दानी साहसी खेळाचे प्रात्यक्षिक उपळे ता.राजापुर येथील युवकांनी सादर केले याबरोबरच खारेपाटण महाविद्यालयाचे एन एस एस विभागाचे विद्यार्थ्यांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव,माजी सरपंच तथा सकल मराठा समाज खारेपाटण विभाग अध्यक्ष श्री रमाकांत राऊत, कालभैरव – दुर्गादेवी मंदिर खारेपाटण ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर गुरव,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रवीण लोकरे,सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई,खारेपाटण व्यापारी असो अध्यक्ष प्राजल कुबल,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,एन एस एस विभगाचे प्रमुख प्रा.वसीम सय्यद, तेजस झगडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे चे सभासद व ग्रामस्थ यांनी शिवजयंती सोहळ्याला भेट दिली.रॅलीमध्ये सहभाग घेतला.
प्रारंभी खारेपाटण किल्ल्यावर शिवप्रतीमेचे पूजन खारेपाटण केंद्र शाळेतील ५ विद्यार्थिनी तथा शिवकन्या यांच्या शूभहस्ते करण्यात आले. यावेळी राजकोट किल्ला मालवण येथून खारेपाटण किल्ल्यावर शिवज्योत घेऊन आलेल्या करण भिसे व त्यांचे सह कऱ्यांचे उस्तव समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर खारेपाटण किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य गीत सामूहिक म्हणण्यात आले व सर्व उस्थिताना ध्येय मंत्र देण्यात आला.
यावेळी शिवजयंती निमीत्त देवरूख येथील शिवव्याख्याते युयुस्तू आर्ते यांनी मार्गदर्शन करताना देशात कोट्यवधीची स्मारके निर्माण करण्यापेक्षा शिवकालीन गड किल्ले जतन व त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
सायंकाळी खारेपाटण किल्ल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक पोवाडे,व भावगीते आणि शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रम सादर करण्यात आला. तर किल्ल्यावर विद्युत रोषणाई करून किल्याचा परिसर उजळविण्यात आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाला खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण शिवजयंती उत्सव कमिटीचे आयोजक ऋषिकेश जाधव यांनी केले. तर सर्वांचे आभार शिवजयंती उत्सव कमिटीचे कार्यवाह मंगेश गुरव यांनी मानले.













