खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ उपक्रम राबविण्यात येत असून माध्यमिक विभागात कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलला तालुका स्तरीय मूल्यमापनसमितीच्या परीक्षण अहवालात कणकवली तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून शाळेच्या या दैदिप्यमान यशा बद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी शाळेचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मूल्यमापन समितीच्या निकालानुसार विजेत्या शाळांना रोख रकमेची पारितोषिके देखील शासनाने जाहीर केली असून जिल्हा तसेच राज्य स्तरावर मूल्यमापन मध्ये यशस्वी ठरणाऱ्या शाळांना लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी शाळेला मिळालेल्या यशामुळे आपल्या खारेपाटण गावचे नाव उज्ज्वल झाले असून खारेपाटण शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ सदस्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी घेत असलेले परिश्रम तसेच त्याला ग्रामस्थांनी दिलेल्या पाठिंबा मुळेच हे यश आपल्या शाळेला मिळाले असल्याची प्रतिक्रिया दिली.













