कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचालित ल. गो. सामंत विद्यालय चे माजी मुख्याध्यापक कै.विष्णू शंकर पडते यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या रोटरीयन मेघा अजय गांगण यांनी प्रशालेला इंसिनरेटर मशीन (Sanitory pad disposal machine )स्वखर्चाने खरेदी करून ‘विशाखा’ उपक्रमा अंतर्गत रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्यामार्फत दिली, त्याबद्दल हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई च्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
या प्रसंगी रोटरी क्लब, कणकवलीच्या अध्यक्षा रो.वर्षा बांदेकर, रोटरी क्लब च्या सचिव रो.उमा परब, रोटरिअन नितीन बांदेकर, तृप्ती कांबळी,स्थानिक शालेय समिती अध्यक्ष ओमप्रकाश ताम्हाणेकर, कॉलेज कमिटी सदस्य सूर्यकांत तेली, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.नेवाळकर, महाविद्यालय विभाग प्रमुख कु. पाताडे,जेष्ठ शिक्षक पाटील,सौ.नवाळे,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी हे मान्यवर उपस्थित होते.
‘विशाखा’ उपक्रमाअंतर्गत कणकवलीतील प्रथितयश डॉक्टर तथा रोटरिअन डॉ.आश्विनी नवरे यांनी ‘मोबाईलचा अनावश्यक वापर आणि आरोग्यावर होणारे परिणाम ‘ या सद्यस्थितीतील गंभीर व घातक अश्या विषयावर विद्यार्थ्यांसोबत चर्चा घडवून आणली.तसेच या चर्चेत छान उत्तरे देणाऱ्या विद्यार्थिनींना डॉ. नवरे यांच्या मार्फत बक्षिसेही देण्यात आलीत.
रो.मेघा गांगण यांनीही आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचनास प्रोत्साहित केले. मोबाईल ला विकल्प म्हणून वाचन करून वैयक्तिक विकास साधता येऊ शकतो असे विचार मांडले. त्याचप्रमाणे शाळेविषयी विशेष असणारे ऋणानुबंध, बांधिलकी व्यक्त केली.
रोटरी क्लब च्या अध्यक्षा रो.वर्षा बांदेकर यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. पाटील यांनी सर्वांचे स्वागत तसेच ‘विशाखा’ समितीच्या अध्यक्षा तथा प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका आर.आर नवाळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन कॉलेज विभाग प्रमुख कु. डी.एस.पाताडे यांनी केले.