५,७८१ कर्मचारी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती
ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आतापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. यापुढेही ही निवडणूक शांततेत पार पडावी तसेच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी जिल्ह्यात ५ हजार ७८१ कर्मचारी, १०७ पोलिस अधिकारी, ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, एक अपर पोलिस अधीक्षक आणि एक पोलिस अधीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिकारी डॉ मोहन दहिकर यांनी दिली आहे.
निवडणूक बंदोबस्त बाबत माहिती घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ दहिकर यांनी माहिती दिली. यावेळी पुढे बोलताना त्यांनी यासाठी जिल्ह्याच्या बाहेरून ६०० पोलिस कॉन्स्टेबल, २५ अधिकारी, १७४२ होमगार्ड आणि दोन राज्य राखीव पोलिस तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातील उपलब्ध सुरक्षा यंत्रणेतील एक पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक यांच्यासह तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, ८२ पोलिस अधिकारी, १२१७ पोलिस कॉन्स्टेबल, १७४२ होमगार्ड आणि दोन राज्य राखीव पोलिस दल तुकड्या यांचा यात समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या बाहेरून मागविलेला अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असे सांगितले.
यावेळी पुढे माहिती देताना पोलिस अधीक्षक दहिकर यांनी, निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी ३७५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. ३११ जणांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. १०१ जणांना पहिली नोटीस तर १४४ जणांना अंतिम नोटीस बजावली आहे. दारू प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या ३६ जणांकडून बाँड करून घेण्यात आला आहे. तर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या ९१३ जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आचारसंहिता काळात दारूच्या एकूण ५६ केसेस करण्यात आल्या असून ५७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण मुद्देमाल ७१ लाख ४७ हजार ११० रुपयांचा पकडण्यात आला असून निव्वळ दारू ५५ लाख २७ हजार ११० रुपयांची पकडण्यात आली आहे, असे सांगितले.
करण्यात आलेल्या कारवाईत एक तलवार जप्त करण्यात आली आहे. सात जणांना नजिकच्या तीन जिल्ह्याच्या बाहेर तडीपार करण्यात आले आहे. ९५ टक्के शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. जे सुरक्षेच्या सेवेत कार्यरत आहेत अशा ९० माजी सैनिकांना यातून सूट देण्यात आली आहे. ऑल इंडिया परमिट असलेल्या व जिल्ह्याबाहेर कार्यरत असलेल्या शस्त्र परवाना धारकांची शस्त्रे जप्त करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.












