कणकवली (प्रतिनिधी) : उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांचे बंधू, उद्योजक किरण सामंत हे लोकसभा निवडणुकीत महायुती चे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार आहेत. लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर असतानाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या किरण सामंत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जात भेट घेतली.ठाकरे गटाचे रामू विखाळे, संजय पारकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांच्या सह विजय पारकर यांची किरण सामंत यांनी भेट घेत चहापान केले. ठाकरे गटाकडून इंडिया आघाडीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच पुन्हा रिंगणात आहेत. अशा वेळी शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार किरण सामंत यांनी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या रामू विखाळे, संजय पारकर, प्रसाद अंधारी यांची घेतलेली भेट ही कणकवली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.