फोंडाघाट येथील दीपक फोंडेकर यांना विजवीतरण चा धक्का
कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट साईनगर येथील दीपक पांडुरंग फोंडेकर यांच्या राहत्या घरी वीज मीटर जोडणी न करताच 1 हजार रूपयांचे विजवापर केल्याचे बिल पाठवून विजवीतरण ने ऐन होळीत धक्का दिला आहे. विजवीतरण च्या या अनागोंदी कारभाराचा नाहक मनःस्ताप दीपक फोंडेकर याना झाला असून फोंडेकर यांनी विजवीतरण च्या फोंडाघाट येथील कार्यालयात सहाय्यक अभियंत्यांकडे धाव घेतली आहे. दीपक फोंडेकर हे फोंडाघाट साईनगर येथे घर बांधून राहत आहेत. आपल्या घरात विजजोडणी साठी त्यांनी विजवीतरण कडे मीटरजोडणीचा अर्ज दाखल केला होता. 31 मार्च अखेरपर्यंत दीपक यांना विजमिटर जोडणी करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप विजमिटर जोडणी करण्यात आलेली नसली तरीही फोंडेकर यांच्या नावाने 100 युनिट विजवापर दाखवत 1 हजार रुपयांचे वीजबिल त्यांच्या हातात देण्यात आले. विजमिटर जोडणी झाली नसतानाही आलेल्या लाईट बिलामुळे फोंडेकर यांना ऐन होळीत विजवीतरण ने न वापरलेल्या विजेच्या बिलाचा झटका दिलेला पाहून घाम फुटला. त्यांनी तात्काळ फोंडाघाट येथील विजवीतरण च्या कार्यालयात धाव घेतली. आपली चूक मान्य करत चूक दुरुस्त करून घेऊ अशी दिलगिरी विजवीतरण च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.














