अवघ्या 4 दिवसांत चोरीचा छडा लावत आरोपीच्या आवळल्या मुसक्या; भरदिवसा दोडामार्ग बाजारपेठेत झाली होती चोरी

दोडामार्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : भरदिवसा बाजारपेठेत झालेल्या चोरीचा छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात दोडामार्ग पोलिसांना यश आले असून आरोपी रामेश्वर केशव म्हाळसेकर याला गजाआड केले आहे. 24 मार्च रोजी पुण्याहून दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे गावी आलेल्या रसिका गवस या खरेदीसाठी श्रीराम सुपर मार्केटमध्ये गेल्या होत्या. खरेदीला जाताना त्यांनी टुरिस्ट बॅग दुचाकीवर ठेवली होती. ही बॅग चोरट्याने चोरून नेली होती. बॅगेत असलेले सोन्याचे दागिने, कॅमेरा, स्मार्ट वॉच आदी 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यापासून दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी व सहकारी पोलीस कर्मचारी चोरट्याचा शोध घेत होते. गोपनीय माहितीनुसार महिला पोलीस हवालदार डिसोझा याना चोरटा होंडा गोवा येथे असल्याचे समजले. पोलीस अधीक्षक अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावल, पोलीस उपअधीक्षक आढाव यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, व 2 होमगार्ड सह होंडा येथे जाऊन गुरुवार 28 मार्च रोजी रात्री 9 वाजता चोरटा रामेश्वर केशव म्हाळसेकर ( रा. म्हाळसा, पर्यें, साखळी, गोवा ) याला होंडा येथे अटक केली. आरोपीकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी सोन्याची कर्णफुले, रोख 15 हजार 850 रुपये जप्त करण्यात आले आहेत. चोरी केली बॅग आरोपीने आयी येथे फेकून दिली होती, सदर बॅग सुद्धा जप्त करण्यात आली आहे.अवघ्या 4 दिवसांत भरदिवसा घडलेल्या चोरीचा छडा लावल्याबद्दल दोडामार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!