४ एप्रिल रोजी कुडाळ येथे भव्यदिव्य मालवणी ॲवॉर्ड शोचे आयोजन.

सन्मान बोलीभाषेचो ! अभिमान मालवणी माणसाचो. या टॅगलाईनखाली ” रील्स मालवणी ” च्या वतीने आयोजन.

यावर्षी कलासिंधु सन्मान या मानाच्या पुरस्कारासह इतर १५ पुरस्कारांचे होणार वितरण.

कुडाळ (अमोल गोसावी) : वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून मालवणी बोलीभाषा सातासमुद्रापार पोचवणारे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी रील्स मालवणी ग्रुपच्या वतीने मालवणी अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन गुरूवार दि.४ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे करण्यात आले आहे. यावेळी मालवणी भाषेसाठी विशेष काम करणा-या कलाकरांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला कला सिंधु सन्मान पुरस्कार कुडाळ येथील दिग्दर्शक, नाट्यकर्मी चंदू शिरसाट यांना जाहीर करण्यात आला आहे. या अवॉर्ड शोच्या निमित्ताने मालवणी रिल्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती, रील्स मालवणीचे अध्यक्ष तुषार तळकटकर व सहका-यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेला रिल्स मालवणी कुडाळचे अध्यक्ष अध्यक्ष तुषार तळकटकर, क्रिएटिव्ह हेड तेजस मसके, सदस्य रुचिता शिर्के, निलेश गुरव, चांदणी कांबळी, हर्षवर्धन जोशी, सचिन कोंडसकर, किशोर नाईक, रामचंद्र आईर, ओंकार मसके आदी उपस्थित होते.

माहिती देताना अध्यक्ष तुषार तळकटकर व सदस्य निलेश गुरव म्हणाले, ४ एप्रिल हा मालवणी नाट्यसम्राट मच्छिंन्द्रनाथ कांबळी यांचा जन्मदिवस असून हा दिवस मालवणी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून रील्स मालवणी या ग्रुपच्यावतीने या मालवणी अवॉर्ड वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. ‘सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो’ अशी टॅगलाईन घेऊन हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा पाहण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नसून, सर्वांसाठी खुला आहे. मालवणी भाषेचे जतन व संवर्धन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, गतवर्षी या सोहळ्याला सिंधुदुर्गवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीही मोठ्या दिमाखात हा अवॉर्ड शो होणार आहे, अशी माहीती अध्यक्ष तुषार तळकटकर व सदस्य निलेश गुरव यांनी दिली.

यावेळी तेजस मसके म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून रिल्स मालवणी हा ग्रुप मालवणी बोलीभाषेचा जागर करीत आहे. यंदापासून दरवर्षी मानाचा असा कला सिंधु सन्मान हा पुरस्कार मालवणी भाषेसाठी विषेश काम करणा-या व्यक्तीला दिला जाणार आहे. रोख अकरा हजार रूपये, मानपत्र, शाळ व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षीचा हा पुरस्कार नाट्यचळवळीत योगदान असलेले दिग्दर्शक, नाट्यकर्मी चंदू शिरसाट यांना जाहीर करण्यात आला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

या मालवणी अवॉर्ड शो च्या निमित्ताने मालवणी रिल्स बनविण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. मालवणी भाषेतील आणि मालवणीत्व असलेली, मालवणी मातीशी नाते सांगणारी दिड मिनीटांची रिल्स बनवून ती आयोजकांकडे पाठवायची आहे. या रिल्स स्पर्धेसाठी माझी भाषा मालवणी भाषा हा विषय देण्यात आला आहे. मोठ्या संख्येने स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन रुचिता शिर्के यांनी यावेळी केले.

मालवणी भाषा जपणाऱ्या, बोलीभाषा अभिमानानं मिरवणाऱ्या इरसाल मालवणी माणसांचो हक्काचो सन्मान, टॅगलाईन खाली या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवणी भाषेसाठी विशेष काम करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यात सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक (influencer) पुरुष, सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक (influencer) स्त्री, सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार, सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली, सर्वोत्कृष्ट मालवणी नाटट, सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सेरीज, सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती अभ्यासक, सर्वोत्कृष्ट मालवणी मालिका, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालवणी पत्रकार, सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार, सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, सर्वोत्कृष्ट मालवणी दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट मालवणी रील अशा विविध प्रकारात मालवणी अवॉर्डचे वितरण होणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा मालवणी अवॉर्ड सोहळा संपन्न होणार आहे. हा मालवणी अवॉर्ड शो सगळ्यांसाठी खुला आणि मोफत आहे. मालवणी बोलीभाषेच्या या जागरासाठी सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, रील्स मालवणीच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे.

error: Content is protected !!