वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे येथील अदिष्टीदेवी मंदिरातील दान पेटी फोडून अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत मंदिराचे पुजारी सीताराम तुकाराम गुरव रा. खंबाळे मधळीवाडी यांनी वैभववाडी पोलीस ठाणेत तक्रार दिली आहे.
वैभववाडी फोंडा मार्गांवर खंबाळे मधळीवाडी येते गावचे ग्रामदैवत श्री देवी आदिष्टी देवीचे मंदिर आहे. पुजारी गुरव यांचे घर मंदिरालगत आहे. नेहमी मंदिरातील लाईट चालू बंद करतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी मंदिरातील लाईट चालू करून घरी गेले. मंगवारी सकाळी लाईट बंद करायला ते आले असता त्यांना मंदिरातील दान पेटीची दोन्ही कुलपे तोडून दान पेटी फोडलेली दिसली. त्यांनी या बाबत देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ पवार व ग्रामस्थांना माहिती दिली. घटनेची खबर मिळताच सहाय्यक सुनील अवसरमोल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे. फंड पेटीत अंदाजे चार ते पाच हजार रुपये असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वैभववाडी फोंडा या नेहमी रहदारी असलेल्या रस्त्यालगच्या मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडल्यामुळे पुन्हा एकदा मंदिरातील दानपेठ यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.











