दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर सलग ७९ तास भाविकांसाठी खुले राहणार आहे. सोमवारी (ता. २२) पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ते गुरुवारी (२५) रात्री ११ वाजता बंद केले जाणार आहेत. पाडळी (जि. सातारा) येथील मानाच्या पहिल्या क्रमांकाची सासनकाठी यात्रेसाठी काल सकाळी गावातून मार्गस्थ झाली. ही सासनकाठी सोमवारी दुपारी चार वाजता डोंगरावर दाखल होईल.

दरम्यान, यात्रेच्या तयारीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी वाहन पार्किंग, तसेच डोंगराकडे येणारे मार्ग, मुख्य रस्त्याचा परिसर, स्वच्छतागृह आदींची पाहणी केली. जोतिबा मंदिर मार्ग दर्शनरांग, सासनकाठी मार्गाची पाहणी केली. एस. कार्तिकेयन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, चैत्र यात्रेनिमित्त डोंगरावर राज्यभरातून भाविक येत आहेत. भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केली असून महावितरण कंपनीने सर्वत्र विजेची व्यवस्था केली आहे. आज लातूर, बीड, कर्नाटक या भागातील भाविक सासनकाठीसह दाखल झाले. मंदिर परिसरात तर हलगी, पिपाणी, सनई, ढोल, हलगी या वाद्यांनी जोर धरला. सासनकाठीवर गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीमुळे डोंगर यात्रेआधीच गुलालमय झाला असून रविवारी, तर डोंगर गर्दीने फुलून जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!