आचरा रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता…!

शाही थाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक ठरली लक्षवेधी

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाची सांगता शनिवारी पहाटे लळीताने झाली. यावेळी पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत बसवून मंदिराभोवती ‘हर हर महादेव च्या जयघोषात सोमसूत्री प्रदक्षिणा करण्यात आली. आतषबाजी व तोफेच्या सलामीने सुरू झालेल्या पालखीला हजारो भाविक उपस्थित होते. देवस्थानच्या रामनवमी उत्सव सांगता सोहळ्यात शाही थाटातील पंचमुखी महादेवाची पालखी मिरवणूक लक्षवेधी ठरली.

उत्सवाच्या लळिताला वर्षातून एकदाच पंचमुखी महादेवाची मूर्ती पालखीत विराजमान करून रामेश्वर मंदिरास सोमसूत्री प्रदक्षिणा घालण्यात येते. या पालखी सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. बाल कलाकारांसह तरुण ज्येष्ठांनीही तलवारबाजी, लाठीकाठी प्रात्यक्षिके सादर करीत रंगत आणली. पालखीनंतर उत्सवाच्या सांगतेचे कीर्तन रंगले. पहाटे कीर्तन आटोपल्यानंतर श्रींच्या पंचारतीबरोबर रघुपतीच्या दहा आरत्या एकाचवेळी बाहेर पडत श्री देव रामेश्वरच्या मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आल्या. कीर्तनाची सांगता झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून श्रीफळ वाटण्यात आले. उत्सव सुरक्षितपणे पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!