एकाच दिग्दर्शकाच्या दोन्ही एकांकिकांची मुंबईत हवा
“वॉरंट” आणि “जापसाल” ची मुंबईतील प्रेक्षकवर्गाला भुरळ
कणकवली (प्रतिनिधी) : आम्ही मालवणी ग्रुप तर्फे आयोजित केलेल्या पहिल्या वहिला राज्यस्तरीय मालवणी एकांकिका स्पर्धा 2024 याची प्राथमिक फेरी आठवड्याभरापूर्वी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरूनकर यांच्या मिनी हॉलमध्ये आणि वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर त्याचबरोबर कलेक्टर खत्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यामध्ये मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एकूण सहा एकांकिका महाअंतिम फेरी करिता निवडण्यात आल्या होत्या. दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न गाणंसम्राज्ञी लता मंगेशकर लघु नाट्यगृह – मिरा रोड येथे महाअंतिम फेरी दिमाखात पार पडली. यावेळी मालवणी सोबतच सेनेसृष्टीतील असंख्य कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील रहिवासी चाकरमानी मालवणी माणसासोबतच मुंबईतील प्रेक्षक वर्गाने मालवणी एकांकिका स्पर्धेतील सादर झालेल्या कलाकृतींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित, शेखर गवस दिग्दर्शित, अमर जवान क्रिएशनच्या वॉरंट ह्या एकांकिकेला सांघिक तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच त्यातील कलाकार शुभम जाधव याला सर्वोत्कृष्ट अभिनेता तृतीय पारितोषिक प्राप्त झाल ( वॉरंट). त्याचप्रमाणे सौ. सरोज सावंत यांची निर्मिती असलेल्या श्री गणेश कलामंचच्या “जापसाल” या एकांकिकेला सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. तसेच प्राजक्ता नेरुळकर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम (जापसाल), सत्यवान गावकर सर्वोत्कृष्ट अभिनेता द्वितीय (जापसाल), विठ्ठल गावकर सर्वोत्कृष्ट अभिनेता तृतीय (जापसाल), शेखर गवस, सुजित परब, सुजित तांबे, अमर पवार, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत (जापसाल) अशा बक्षीसांची लयलूट केली. या दोन्ही एकांकिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाअंतिम फेरी करिता पात्र ठरल्या होत्या आणि अंतिम फेरीत देखील या दोन्ही एकांकिकांनी आपल्या विजयाचा डंका मुंबईमध्ये वाजवला यानिमित्ताने या एकांकिकेतील सर्व कलाकार लेखक – दिग्दर्शक शेखर गवस यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही दैदीप्यमान कामगिरी करून दाखवली.
प्राथमिक फेरी करिता सत्येंद्र जाधव लिखित दिग्दर्शित “नटीचा काय?” या एकांकिकेकरिता सत्यवान गावकर याला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले. तसेच ओसरगाव शाळा नंबर एक निर्मित, शेखर गवस लिखित, किशोर कदम दिग्दर्शित, आये या एकांकिका करिता तुषार डुकरे याला अभिनय गुणवत्ता प्रमाण पत्र प्राप्त झाले.
या दोन्ही एकांकिकांकरिता ज्येष्ठ रंगकर्मी सुहाजी वरूनकर यांचे मोलाचं मार्गदर्शन प्राप्त झालं या संपूर्ण मालवणी एकांकिका स्पर्धा 2024 प्रथम वर्ष प्रमुख कार्यवाहक श्री. विठ्ठल सावंत त्याचबरोबर संचालक सतेज दळवी आणि टीम यांचे प्राथमिक फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत उत्तम आयोजन पाहायला मिळालं या मिळालेल्या सर्व यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव या दोन्ही टीमवर होत आहे.












