पणदूर महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा


कुडाळ (प्रतिनिधी) : पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने कवी ‘कुसुमाग्रज जयंती’ तसेच ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला . सुरुवातीला प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. एस. वाय. आयटीच्या चमुने कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ ही प्रार्थना म्हणून मुख्य कार्यक्रमाची शुभ सुरुवात करण्यात आली . ग्रंथपाल सुशांत वालावलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व प्रास्ताविकामधून आजच्या दिनाचे महत्व विषद केले.

मराठी भाषेचा जागर करण्यासाठी महाविद्यालयातील सुमारे ७० विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील उत्तम कविता, नाटकामधील स्वगत, तसेच मराठी भाषेची थोरवी सांगणारी विविध गीते सादर करून कार्यक्रम बहारदार केला. प्राचार्य शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना मराठी भाषेच्या इतिहासाचा , विविध बोलीभाषा, तसेच साहित्यिक वि. वा. शिरवाडकरांच्या साहित्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला .

ओव्या ,आणि कविता चालीत म्हटल्या तर त्या अधिक चांगल्या भावतात असे विद्यार्थ्यांना सांगत त्यांनी उदाहरणादाखल काही मुखोद्गत असणाऱ्या कविता चालीत म्हणून दाखविल्या या कार्यक्रमाला ग्रंथालय समितीचे सदस्य प्रा. प्रथमेश गोसावी, प्रा .भाग्यश्री गावडे, प्रा.स्मिता परब, प्रा .तन्वी सिंघन, तसेच सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संचिता कोलापटे यांनी केले तर प्रा. प्रथमेश गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व उपस्थितांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांना मुखोद्गत असलेल्या ‘पसायदान’ ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!