देशात लोकशाही व संविधानाचे जतन करणारे सरकार येईल
कणकवली (प्रतिनिधी) : लोकशाही, राष्ट्रहित, वैज्ञानिकता, धर्मनिरपेक्षता यासह देश व समाजहिताच्या कार्यात राष्ट्र सेवा दलाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.राष्ट्र सेवादलातर्फे विद्यार्थ्यांसाठी वर्षाला देशभरात विविध ठिकाणी १०० हून अधिक व्यक्तिमत्व शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणला जातो.अशी माहिती राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी दिली.
अद्वैत फाऊंडेशन व राष्ट्रीय सेवा दलाच्या संयुक्त विद्यमाने वागदे येथील गोपुरी आश्रामात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अद्वैत फाऊंडेशनच्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण उपस्थित होते.
बाबासाहेब नदाफ म्हणाले,
शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनावर लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिकवाद, राष्ट्रवाद यासह समाजहिताचे संस्कार रुजवले जात आहेत. देशातील युवा पिढीच्या हाती रोजगार नाही. परिणामी तरुण व तरुणी आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात युवा पिढी अडकल्यामुळे देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीयसह अन्य प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी ही पिढी पुढे सरसावताना दिसत नाही.
बाबासाहेब नदाफ म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व हिंदूस्थान सेवा दल कार्यरत होता. स्वातंत्र्यनंतर या दलात दोन गट पडले. यातून काँग्रेस सेवा दल व राष्ट्रीय सेवा दल या दोन दलाची निर्मिती झाली. राष्ट्र सेवा दल राष्ट्रसेवा व समाजहिताला प्राधान्य देणारी संघटना आहे. या संघटनेवर समाजवादीचा पडगा आहे, असे त्यांनी सांगितले.
अलीकडच्या काळात समाजात विषमता वाढत असून ही विषमता समाज व देशासाठी घातक आहे. ही विषमता दूर करण्याचे कार्य राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे सुरु आहे. लोकशाही, राष्ट्रहित, वैज्ञानिकता, धर्मनिरपेक्षता यासह देश व समाजहिताच्या कार्यात राष्ट्र सेवा दलाचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. मुलांसाठी वर्षभरात राष्ट्र सेवा दल देशभरात १०० हून अधिक शिबिरे घेत असते, असे त्यांनी सांगितले. यानंतर मालवण व वेंगुर्ले येथे शिबिरे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यकर्त्यांना सत्तेची धुंद चढली आहे. त्यामुळे देश व समाजाचे मोठे नुकसान होत आहे. सत्तेच्या धुंदीपायी राज्यकर्त्यांना देश व समाजहिताचे भान राहिलेले नाही. सत्तेच्या धुंदीमुळे पक्ष व संघटनांच्या माध्यमातून कार्यकर्ते घडविण्याची प्रक्रियेला अलीकडच्या काळात ब्रेक लागला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
केंद्रातील मोदी सरकार व भाजप लोकशाही व संविधान विरोधी आहे. हे सरकार भांडवलीशाहीसाठी काम करीत आहे. त्यामुळे या सरकारला शेतकरी व सर्वसामान्यांचे देणेघेणे राहिलेले नाही. भाजपकडून जाती जाती व धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. त्यामुळे राष्ट्र सेवा दलाने केंद्रातील मोदी व भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही व संविधान विरोधी मोदी सरकारचा पराभव होऊन देशात लोकशाही व संविधानाचे जतन करणारे सरकार येईल, असा विश्वास बाळासाहेब नदाफ यांनी व्यक्त केला.











