खारेपाटण येथील नाभिक बांधव अनंत चव्हाण यांनी जपली सामाजिक बांधिलकी

मुलीच्या लग्नात मिळालेली आहेराची रक्कम केली आदिष्ठी मंदिराला दान

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण संभाजीनगर गुरववाडी येथील सुपुत्र असलेले नाभिक बंधू अनंत भिकाजी चव्हाण हे आपला पिढीजात असलेला नाभिक व्यवसाय सांभाळत असतानाच अनंत चव्हाण यांनी नुकतीच श्रध्देने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलीच्या लग्नात मिळालेली आहेराची सर्व रक्कम ही वारगाव आदिष्ठी मंदिराला दान केली.त्यांच्या या उल्लेखनिय आणि अनुकरणीय उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

अनंत चव्हाण यांनी या आधी सुद्धा आपल्या दोन्ही मुलींच्या लग्नात आलेल्या आहेराची सर्व रक्कम ही खारेपाटण येथील दोन मंदिरांना दान केली होती.आता तिसऱ्या मुलीच्या लग्नात देखील आलेली आहेराची सर्व रक्कम सुद्धा त्यांनी आदिष्टी मंदिराला अर्पण केली आहे. याबाबत सांगताना श्री चव्हाण म्हणाले ‘ माझ्या तिन्ही मुलीच्या लग्नाचा जो आहेर येईल तो मी श्रध्देने मंदिर सेवेसाठी अर्पण करेन असा माझा कायम मानस होता.व त्यानुसार मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या आहेराची सर्व रक्कम ही मंदिरांना अर्पण केली आहे.तसेच त्यांनी याआधी सुद्दा श्रध्देपोटी मंदिरांना देणगी स्वरुपात मदत केल्याचे ते सांगतात आणि भविष्यात ही असेच सामाजिक कार्य करीत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कणकवली तालुक्यातील वारगाव येथील श्री देवी आदिष्टी मंदिराच्या ट्रस्टी कडून अनंत चव्हाण यांचे आभार मानण्यात आले. यावेळी मंदिर ट्रस्ट चे अनिल कुलकर्णी, शांताराम घाडी,गोपीनाथ मेस्त्री, ओमकार चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!