मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होत आहे. यंदा २३ हजार १० शाळांतील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र दहावीच्या विद्यार्थी नोंदणीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. बारावीप्रमाणेच दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षा केंद्रांवर काटेकोर बंदोबस्त ठेवला जाईल, भरारी पथके बैठी पथके परीक्षा केंद्रावर असतील. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत ६१ हजार विद्यार्थी कमी झाले आहेत.