1 जून रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे होणार पुरस्कार वितरण
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनल येथील सुपुत्र प्रा. वैभव साटम यांच्या भावकी अन गावकी या ललीतलेखसंग्रहास कै. वामन अनंत रेगे साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून 1 जून रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ख्यातनाम साहित्यिक कृष्णात खोत यांच्या हस्ते मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या 131 व्या वार्षिक उत्सवात पुरस्कार वितरण केले जाणार आहे. रोख रक्कम 5 हजार, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 1 जून रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय सरस्वती मंदिर, वा.अ. रेगे सभागृह ठाणे येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे च्या वतीने अत्यंत सन्मानाच्या ललित गटातील पुरस्कारासाठी प्रा. वैभव साटम यांच्या ललित लेखसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यातील आयनल गावचे सुपुत्र प्रा. वैभव साटम हे घोडबंदर ठाणे येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षक पदी कार्यरत आहेत. प्रा. वैभव साटम यांची कोकणीमाती कादंबरी, बिटकी , पाणंद हे ललीतसंग्रह, सहा माणसांच्या सहा गोष्टी दिर्घकथासंग्रह देवाघरची लेणी व्यक्तिचित्रण,श्रेयस च्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी हे बालसाहित्य, मालवणी वळेसार आदी साहित्य प्रसिद्ध आहे. प्रा. साटम यांना याआधी एकता कल्चर च्या वतीने कवी नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, सृजन संवाद मूर्तजापूर यांच्या सृजन प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी ग्रंथ संग्रहालायचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. साटम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.