विज्ञानवादी आदर्श पिढी घडवण्याचे काम अद्वैत फाऊंडेशन ने केले
अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल शिबिराचा समारोप
कणकवली (प्रतिनिधी) : संविधान ,समाजभान आणि समानतेची शिकवण जपणारी युवा पिढी राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून घडवली जाते. कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी त्याकाळी भंगीकाम, कातडी कमावण्याचे काम स्वतः करून तळकोकणात सामाजिक समानतेची क्रांती केली होती. अद्वैत फाऊंडेशन ने कोकणगांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रम मध्ये राष्ट्र सेवा दलाचे शिबीर आयोजित करून विज्ञानवादी आदर्श युवा पिढी घडवण्यासाठी हातभार लावला आहे. राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात समोरच्या माणसाला समजून घेताना माणुसकीची शिकवण मिळते. शिबिरातून विवेकवादी पिढी घडवली जाते असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिजित हेगशेट्ये यांनी केले. अद्वैत फाऊंडेशन कणकवली च्या वतीने गोपुरी आश्रम येथे आयोजित राष्ट्र सेवा दल व्यक्तीमत्व विकास निवासी शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्र सेवा दल चे राष्ट्रीय संघटक बाबासाहेब नदाफ, अद्वैत फाऊंडेशनच्या अध्यक्ष सरिता पवार, सचिव राजन चव्हाण, गोपुरी आश्रम चे उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, संतोष शेट्ये, संतोष जुगळे, श्रीकांत चव्हाण, अजिंक्य गायकवाड, महावीर कडाळे, चंदन माटुंगे, सागर पाटील, विश्वास राशिवडे, राज कांबळे, भाई मेस्त्री, विद्या राणे, हरिश्चंद्र सरमळकर, संगीता सरमळकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना बाबासाहेब नदाफ म्हणाले की, समतेच्या दिंडीतील अद्वैत फाऊंडेशन हे धारकरी आहे. राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात जेव्हा सर्व जातीधर्माची मुले एकत्र येतात तेव्हा मला भारत देशाचे दर्शन होते असे साने गुरुजी म्हणत असत. आज सत्तेसाठी राजकीय नेते तरुणांच्या मनात धार्मिक तेढ निर्माण करणारे हिंदू मुस्लिम वाद घालत आहेत. आदर्श भारत घडविणाऱ्या गांधी नेहरूंच्या चरित्राची विकृत विचारांनी विटंबना केली जात आहे. राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून तरुणांना भारताचा आणि महामानावांचा वास्तववादी खऱ्या इतिहासाचे दाखले दिले जातात. शिबिरार्थीच्या मनात समूहभावना, स्वावलंबीपणा बिंबवला जातो. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, समाजभान आणि मानवता जाच धर्म हा विचार जपणारी पिढी सलग 7 वर्षे राष्ट्र सेवा दलाचे शिबीर आयोजित करून अद्वैत फाऊंडेशन ने घडवण्यात खारीचा वाटा उचलला आहे. केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर रत्नागिरी पुणे मुंबई तील आणि गोव्यातील पालकांचा विश्वास अद्वैत फाऊंडेशन जे कमावला आहे. शिबिरातील बौद्धिक, ग्रेट भेट उपक्रमातून विधायक नवनिर्मिती करणारे वैचारिक बैठक पक्की असणारे आणि माणूस म्हणून जगताना इतरांनाही जगवणारे देशभक्तीने प्रेरित कार्यकर्ते घडतील. संतोष जुगळे यांनी मनोगतात वर्ण जात धर्म गरीब श्रीमंत भेदा पलीकडे विचार करायला या शिबिरातून शिकवले जाते. माणूस या एकाच पातळीवर जगायला शिकवले जात असल्याचे संगितले. समारोप प्रसंगी शिबीरार्थीनी सादर केलेल्या नृत्य, एरोबिक्स दांडिया नृत्य, लेझीम खेळातून कृषी संस्कृती भारतीय संविधान लोकशाही जागृती , मर्दानी लाठीकाठीची प्रात्यक्षिके, झांज नृत्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी सारखी देशभक्ती, समानतेची गाणी सादर केली. शिबिर यशस्वीतेसाठी भानू गोंडाळ, मालती गोंडाळ, विद्या राणे, हरिश्चंद्र सरमळकर, हर्षदा सरमळकर, वेदांत पवार, चिन्मय सरमळकर, नुपूर पवार, सुप्रिया पाटील , शुभांगी पवार यांनी मेहनत घेतली.पालकांच्या वतीने सुहास चव्हाण, प्रिया मळीक यांनी तर शिबिरार्थीच्या वतीने आलीया पडवळ, नितांत चव्हाण, साई चव्हाण, सुमित चव्हाण स्नेहल आचरेकर, हर्षद सावंत, सान्वी चव्हाण, संजना परब यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राजन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.मनीषा पाटील यांनी केले. आभार सरिता पवार यांनी मानले.