चिंचवली मधलीवाडी जि.प.शाळेत तीन नव्या शिक्षकांची नियुक्ती

सूर्यकांत भालेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत नुकतीच जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यात आली. या शिक्षक भरती मधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत तीन नवीन प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून ही नेमणूक करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य सूर्यकांत भालेकर यांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शिक्षण विभागाने प्राधान्याने या शाळेला तीन शिक्षक दिले आहेत.

चिंचवली मधलीवाडी जि.प.शाळेत एकूण चार शिक्षकांची पदे मंजूर आहेत. गेल्या वर्षभर शाळेत केवळ दोनच शिक्षक सविता पवार आणि अमोल भंडारी कार्यरत होते.त्यापैकी अमोल भंडारी हे पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद सोलापूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदावर नियुक्त झाले असल्यामुळे शाळेत केवळ एकच शिक्षिका श्रीमती पवार या कार्यरत होत्या. ही बाब लक्षात घेऊन सूर्यकांत भालेकर यांनी पंचायत समिती कणकवली चे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांच्याकडे आगामी भरतीतून आमच्या शाळेला रिक्त असलेल्या तीन पदांवर शिक्षक मिळावेत अशी मागणी सातत्याने केली. तसेच जर शिक्षक दिले नाहीत तर जून पासून शाळा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांना दिला होता. याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी श्री. गवस यांनी जिल्हास्तरावर चिंचवली मधलीवाडी शाळेसाठी तीन शिक्षक देण्याविषयी कळविले होते. त्यानुसार या शाळेत अजय गरकळ,रेखा डिसले आणि श्रीमती कुरणे अशा तीन नवीन शिक्षकांची नेमणूक झाली आहे. याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!