ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वासीयांनी भाजपच्या बाजूने भरघोस मतदान दिले असून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील जिल्हावासीय जनतेचे असलेले प्रेम दिसून आले. आपण भाजपच्या स्थापनेपासून बारावा अध्यक्ष असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपच्या कमळ चिन्हावर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. भाजपच्या विजयाचा हा कळस असून महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या सहकार्यामुळे हा विजय सोपा झाला अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी.
भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून आपण पदभार स्वीकारला त्यानंतर पहिल्यांदाच भाजपच्या खासदार म्हणून प्रथमच या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यात यश आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या मागील ११ अध्यक्षांनी संघटनात्मक बांधणी चांगल्या पद्धतीने केली होती. या निवडणुकीत भाजपचे खासदार विजय झाल्यामुळे जिल्हाध्यक्षपदावर मिळालेली संधी व या निवडणुकीतील यश तसेच विजयाचा आनंदोत्सव फार मोठा आहे असेही प्रभाकर सावंत म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी मेहनत केली, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे, आरपीआय आठवले गट या सर्व महायुतीतील घटक पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केले त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सावंतवाडी व कुडाळ या विधानसभा मतदारसंघातील मिळालेले मोठे मताधिक्य राणेसाहेबांच्या विजयाचा शिल्पकार ठरले. राणेसाहेबांवरील तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या कामामुळे व भाजपाच्या संघटनात्मक ताकदीमुळे जिल्हा वासियांनी भाजपच्या बाजूने चांगला कौल दिला. त्याबद्दल आनंद आहे. आपल्या अध्यक्षपदावरील हा भाजपचा विजय नेहमी स्मरणात राहील वा भाजपच्या माध्यमातून चांगले काम या जिल्ह्यात करू अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली.