मुलांना मोफत खाऊ आणि पाठ्यपुस्तकांनचे मान्यवरांच्या हस्ते वाटप
दापोली (प्रतिनिधी) : आजच्या दिवशी प्रत्येक मोठ्या व्यक्तिस त्याचे बालपण आठवते, शाळेचा पहिला दिवस आठवतो. उत्तम शैक्षणिक प्रगती साध्य करायची असेल तर हा पहिला दिवस ‘शाळा प्रवेशोत्सव’ म्हणून नेहमीच साजरा व्हायला हवा असे उद्गार दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी चंद्रनगर शाळेतील प्रवेशोत्सव समारोहाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
दरवर्षीप्रमाणे दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत दि. १५ जून २०२४ रोजी शाळा प्रवेशोत्सव समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, भाग्यश्री जगदाळे, शालेय व्यवस्थापन समितीने अध्यक्ष रुपेश बैकर, मोहन मुळे, विजय मुलूख, सदानंद मुलूख, स्वरुप मुलूख, शैलेश मुलूख, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा प्रवेशोत्सव समारोहानिमित्त चंद्रनगर शाळेत प्रभातफेरी, दाखलपात्र विद्यार्थ्यांचे औक्षण करून व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांचे हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळेस नासा- इस्रो परीक्षेत यश संपादन केलेल्या व इस्रो दौरा करुन आलेल्या आरोही मुलूख व नवोदय प्रवेश परीक्षेत उत्तम यश संपादन केलेल्या नीरजा वेदक या विद्यार्थिनींचा गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रवेशोत्सव कार्यक्रमानिमित्त मनोगत व्यक्त करताना गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी शालेय परिसर व प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या स्वरुपाबद्दल समाधान व्यक्त केले. चंद्रनगर शाळेच्या वाटचालीबद्दल शाळेचे अभिनंदन केले. दापोली तालुक्यातील सर्व शाळांमधून आजच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांचे नियोजन पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांच्या नेतृत्वाखाली अतिशय योग्य प्रकारे करण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणासही बालपणीच्या काळातील शाळेचा पहिला दिवस आठवल्याचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी सांगितले. यावेळी मोहन मुळे, विजय मुलूख, सदानंद मुलूख, भाग्यश्री जगदाळे आदींनी शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक बाबू घाडीगांवकर यांनी केले तर मानसी सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.