एस.टी.प्रवासी, नागरीक, विद्यार्थी यांच्याकडून नाराजीचा सूर
नियमित पावसाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासनाने प्रश्न मार्गी लावावेत अशी व्यापारी, प्रवासी व वाहन चालकांकडून मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाला थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाली आहे. पहिल्या एक दोन पावसातच वैभववाडी शहरात अनेक समस्यांनी तोंड वर काढले आहे. वैभववाडी शहरातील गटार कामांचा प्रश्न चर्चेत असतानाच गेल्या दोन चार दिवसात झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणचा भाग चिखलाचा दलदलीचा बनला आहे. तर शहरातील मुख्य संभाजी चौकात दरवर्षी प्रमाणे यंदाही सेल्फी पॉइंट समोरच रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत तर नेहमी प्रमाणे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहे. एस.टी.स्टॅंडच्या आवारात तर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
वैभववाडी शहरात शाळा, महाविद्यालयाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी तर बाजाराच्या निमित्ताने पंचक्रोशीतील नागरिक वैभववाडी शहरात येत असतात. त्यांना या चिखलातून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर या चिखलातून प्रवास करताना गणवेश खराब होऊ नये म्हणून विद्यार्थी व नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त आहेत, रिक्षा स्टँड परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रिक्षा चालकांमध्ये नाराजी आहे. तर मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानासमोर चिखल झाल्यामुळे व्यापारी वर्गाला देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या अजून ऊन पावसाच्या खेळाचे वातावरण असल्यामुळे नियमित पाऊस सुरू होण्यापुर्वी स्थानिक प्रशासनाने एस.टी.स्टॅंड आवार व मुख्य बाजारपेठेतील पाण्याची डबकी, खड्डे बुजवावेत अशी मागणी विद्यार्थी, पालक, व्यापारी वर्ग, वाहन चालकांकडून होताना दिसून येत आहे.