एस. एम. हायस्कूल कणकवलीमध्ये अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने एस. एम. हायस्कूल कणकवलीमध्ये अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे मानवी आरोग्यावर आणि सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी जि. प. सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी (आरोग्य) प्रमोद लिमये यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम निरनिराळ्या उदाहरणाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. आणि आपल्या कुटुंबात किंवा परिसरात व्यसनाधीन असणा-या व्यक्तींना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची श्री. लिमये यांनी उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे शंकासमाधान केले. प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके,उपमुख्याध्यापक आर. एल. प्रधान उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक जी. ए. कदम आणि आभार एस. सी. गरगटे मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!