पेंडूर येथील शोकसभेत संजय नाईक सरांना श्रध्दांजली वाहताना अनेकांना अश्रू अनावर
चौके (प्रतिनिधी) : पेंडूर गावचे हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी सरपंच तसेच वराडकर हायस्कूल कट्टाचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचे ३० जून रोजी आकस्मिक निधन झाले. नाईक सरांच्या निधनाने पेंडूर गावासह संपूर्ण पंचक्रोशीत कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे अनेकांच्या हृदयात आदराचे स्थान निर्माण केलेल्या संजय नाईक सरांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज पेंडूर ग्रामपंचायत सभागृहात पेंडूर ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला नाईक सरांवर प्रेम करणाऱ्या तसेच त्यांचा आदर करणाऱ्या अनेकांनी उपस्थित राहून साश्रुनयनांनी सरांना श्रध्दांजली अर्पण केली.
सर्वप्रथम पेंडूर गावातील ज्येष्ठ नागरीक बाबा पराडकर यांनी गावाच्या वतीने नाईक सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली. त्यानंतर डॉक्टर सोमनाथ परब यांनी नाईक सरांना श्रध्दांजली वाहताना सांगितले की , कोरोनाशी झुंज देउन नाईक सर पुन्हा उभे राहिले होते पण यावेळी काळाने डाव साधला. नेतृत्व , कर्तृत्व , वक्तृत्व आणि दातृत्व या गुणांमुळे सरांनी नावलौकिक मिळवला होता. शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक चळवळीत सर नेहमीच पुढे असायचे. त्यांच्या सारखा कुटुंबवत्सल आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक गेल्याने पेंडूर गावची सामाजिक , शैक्षणिक हानी होणार आहे. असे बोलून नाईक सरांच नाव कायम ठेवण्यासाठी होतकरू विद्यार्थी दत्तक घेऊन त्याचा शैक्षणिक खर्च करावा. असे आवाहन ही डॉ. सोमनाथ परब यांनी यावेळी केले. त्यानंतर नाईक सरांचे सहकारी शिक्षक समीर चांदरकर यांनी सरांविषयी मनोगत व्यक्त करताना म्हटले की संजय नाईक सर हे मैत्री जपणारे व्यक्ती होते. मोठ्या भावाप्रमाणे सदैव आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आमच्यावर विश्वास ठेवून जिद्द निर्माण करण्याचे काम केले.
त्यानंतर सरांचे आणखी एक जवळचे सहकारी संजय पेंडूरकर यांनी सरांच्या दातृत्वाचे अनेक किस्से सांगून सरांच्या जाण्याने पेंडूर गावामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ॲड. प्रदिप मिठबावकर यांनीही सरांना आदरांजली वाहताना सांगितले कि शांत आणि संयमी अशा नाईक सरांना पाहून प्रेरणा मिळायची, शेतकरी जपला पाहिजे जगला पाहिजे ही त्यांची भावना होती भारतीय संस्कृती जपण्याच काम सरांनी केलं.
यानंतर कृतिका लोहार , वैष्णवी लाड , अर्जुन पेंडूरकर , अमित रेगे , सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी संतोष गावडे यांच्या सह उपस्थित काही जणांनी सरांविषयी मनोगत व्यक्त केले. या शोकसभेमध्ये पेंडूर सरपंच स्नेहा परब , उपसरपंच सुमित सावंत , रविंद्र शिरसाठ, दीपा सावंत, आतिक शेख , अमित सावंत, शेखर फोंडेकर, अमित रेगे , संतोष परब, रामू सावंत, अमित सावंत, बाळू राणे, शाम आवलेगावकर, संदीप सरमळकर, दीपक गावडे, मंगेश माडये, प्रदीप आवळगावकर, निलेश हडकर, सुरेश कांबळी, प्रकाश सरमळकर, दादा वायंगणकर, विष्णू लाड, मनोज राऊळ, नितीन राऊळ, संतोष राणे, सत्यवान दळवी, उत्तम परब, अनिल सावंत, दादा गावकर, न्हानु पेंडूरकर, सत्यवान पाटील, आणि ग्रामस्थ व मित्रमंडळी उपस्थित होते.