मोर्ले गावच्या पाणीप्रश्नाविषयी मंत्र्यांचे वेधले लक्ष
दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्गात हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तालुक्यातील हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ योग्य त्या उपाययोजना करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी संबंधित मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान मोर्ले गावचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी मोर्ले गावठाण येथे बंधारा बांधावा आणि कोदाळी (ता. चंदगड), तसेच येथील तिलारी धरणाचे पाणी केर, मोर्ले, पाळये, सोनावल व मेढे गावांना मिळावे, असेही त्यांनी म्हटले आहे. या मागण्यांकडे त्यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे लक्ष वेधले आहेत.
तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागावेत यासाठी श्री. दळवी प्रयत्नशील आहेत. यात प्रामुख्याने तिलारी खोऱ्यात सतावणाऱ्या हत्तींचा तातडीने बंदोबस्त व ठोस उपाययोजना कराव्यात, मोर्ले गावठणवाडी येथे कोल्हापूरच्या धरतीवर मोठा बंधारा बांधून तेथील शंभर हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्याची मागणी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. तसेच कोदाळी येथील धरणातील बोगद्यातून वीजघर येथे सोडण्यात येणारे पाणी पाईपलाइनद्वारे मेढे, सोनावल, पाळये, मोर्ले, केर गावांना देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.