कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरु आहे.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर पडलेले खड्डे यांमुळे वाहनधारकांना होणारा त्रास या प्रश्नी आज शनिवार कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले.खड्ड्यांनी भरलेल्या कोल्हापूर-पुणे महामार्गावर टोल का द्यायचा? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन सुरु आहे. काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राहुल पी.एन. पाटील यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरु आहे. आंदोलनादरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही अशी भूमिका घेत थेट काँग्रेस कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडलायावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले, रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आज पुण्यातून कोल्हापूरला येण्यासाठी सात ते आठ तास लागतात. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.उद्या रुग्णाला जरी न्यायचे झाल्यास त्याला देखील त्याचा फटका बसतो. जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत तोपर्यंत एक रुपयाही टोल घेऊ नका. आज भाकरी घेऊन आलो आहे, निर्णय घ्या आंदोलन मागे घेतो. पण टोल बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.