26 हजार 708 महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे बाकी
महिलांनी बँक खाते तात्काळ आधारला लिंक करुन घ्यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ९८.९७ टक्के नोंदणी झाली असून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी तात्काळ बँक खाते आधार लिंक करुन घ्यावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी महिलांना सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.
आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी एकुण 6 लाख 88 हजार 931 इतके अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 6 लाख 96 हजार 100 अर्ज प्राप्त झाले होते. तथापि 26 हजार 708 लाभार्थ्यांचे आधार नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये दिलेल्या बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत. आधार लिंक नसलेल्या बँक खात्यांची माहिती संबंधित गावात, प्रभागात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र सर्व महिलांचा आधार क्रमांक बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आधार लिंक न केलेल्या बँक खात्यांची तालुकानिहाय संख्या यामध्ये करवीर- 8 हजार 43, हातकणंगले- 4 हजार 941, शिरोळ- 2 हजार 929, कागल- 2 हजार 412, पन्हाळा- 1 हजार 212, गडहिंग्लज- 1 हजार 483, राधानगरी- 1 हजार 707, चंदगड- 861, शाहूवाडी – 1 हजार 207, भुदरगड- 994, आजरा- 673 व गगनबावडा- 246 असे एकूण 26 हजार 708 बँक खाती आधारला लिंक केलेली नाहीत.