पुतळ्याची झालेली विटंबना सोशल मीडियात प्रसारित करू नका शिवप्रेमींची मनसेकडे मागणी
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि कार्यकारी अभियंता सर्वगौड हेच जबाबदार
मालवण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मालवणात झालेल्या तात्पुरत्या हेलीपॅड तसेच राजकोट किल्ल्यावरील बांधकाम निकृष्ट असल्याचे मनसेनेच उघड केले होते. काल पुतळ्याची झालेली विटंबना अनेक राजकीय नेते ,कलाकार,नौटंगीबाज सोशल मीडिया इंफ्लुएन्सर यांनी विटंबना झालेल्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियात पसरवले होते अश्याप्रकारे विटंबना झालेल्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियात प्रसारित झाल्यामुळे मनाला वेदना होत असल्याने शिवप्रेमींची मनसेकडे अश्या लोकांना ‘मनसे स्टाईल’ समज द्यावी अशी मागणी केली असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी संगितले.
मालवण मधील सर्व मनसेचे पदाधिकारी काम निकृष्ट असल्याचे आरडाओरड करत होते त्यावेळी वैभव नाईक झोपले होते का? आमदार वैभव नाईक यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कार्यकारी अभियंता कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकारी अभियंता यांना जाब विचारत असताना तसेच निकृष्ट बांधकामावर बोलत असताना वैभव नाईक गप्प का होते? असा सवाल मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंटबाजी करत मालवणचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय फोडून राजकीय दहीहंडी करण्याची स्टंटबाजी आमदार वैभव नाईक यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.
पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि कार्यकारी अभियंता सर्वगौड हेच जबाबदार असल्याचा आम्ही वारंवार आरोप केला होता. छत्रपतींच्या पुतळ्याची अशी अवस्था होणे दुर्दैवी असून राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आपली जबाबदारी नौदलावर ढकलत आहे. खोटी अंदाजपत्रके बनवणे काही लपवून ठेवणे आणि अंदाजपत्रकाच्या पेक्षा २५ ते ३० टक्के कामे प्रत्यक्षरीत्या करणे हेच उद्योग पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कार्यकारी अभियंता सर्वगौड यांच्या काळात झाले आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे. गेल्या दोन वर्षात टेंडर न काढता कामे झालेली आहेत पण या कामांवर सत्ताधारी तसेच विरोधात असलेले आमदार वैभव नाईक काही बोलताना दिसत नाही किंवा जाब विचारताना दिसत नाहीत यावरून भाजप आणि उबाठा सेना जनतेला गृहीत धरत आहेत आणि त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.त्यामुळे राज्याचा सार्वजनिक मंत्री अशिक्षित असू नये सिव्हील इंजिनीअर असावा अशी मागणी आम्ही शासनाकडे करणार असल्याचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले आहे.