सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशांची उधळण करत असल्याचा केला आरोप
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे 15 संचालक बँकेच्या पैशातून स्वीत्झर्लंड ला अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, ठेवीदार यांच्या पैशातून बँकेला मिळालेल्या उत्पन्नावर हा 10 दिवसांचा स्वीत्झर्लंड दौरा संचालक करताहेत. याबाबत सहकार संचालकांकडे तक्रार करणार असल्याचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. प्रत्येक संचालकामागे 5 लाख रुपये असा एकूण 75 लाख रुपये खर्च या अभ्यास दौऱ्यावर करण्यात आल्याचेही उपरकर म्हणाले. एकीकडे पक्षभेद करत विरोधी पक्षातील शेतकऱ्यांना कर्ज नामंजूर करणाऱ्या जिल्हा बँक सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य ठेवीदारांच्या पैशातून मिळालेल्या उत्पन्नाची उधळण केल्याचा आरोप उपरकर यांनी केला. आज जरी तुम्ही सत्ताधारी असलात तरी उद्या सत्तेतून पायउतार झाल्यावर याचा जाब द्यावा लागेल असा इशाराही उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.