माजी उपसभापती भालचंद्र साठे यांचा इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी उंबर्डे भुईबावडा मार्गांवरील अवजड वाहतूक बंद करावी.अशी मागणी माजी उपसभापती भालचंद्र साठे यांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
करूळ घाट नूतनीकरणासाठी 22 जानेवारी पासून बंद आहे. त्यामुळे या मार्गांवरील सर्व वाहतूक ही वैभववाडी उंबर्डे भुईबावडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी सुरवातीला घाट मार्ग बंद ठेवताना दिलेल्या आदेशानुसार भुईबावडा घाटातून प्रवाशी वाहतूकीला परवानगी दिली होती तर जड अवजड वाहतूक ही फोंडा घाटातून करण्याची सूचना केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत गेले सात आठ महिने प्रवाशी वाहतूकीसह जड अवजड वाहतूक मोठया प्रमाणात सुरु आहे. या अति अवजड वाहतूकीमुळे दोन वर्षांपूर्वी केलेल्या वैभववाडी उंबर्डे भुईबावडा या राज्य मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर ठिकठिकाणी रस्ता खचल्यामुळे या मार्गांवरून प्रवाशी वाहतूक करणेही जीवघेणे ठरत आहे. तसेच भुईबावडा घाट हा अरुंद असून घाटाची क्षमता विचारात घेता अवजड वाहतूक करणे धोकादायक आहे. त्याचप्रमाणे घाटात दोन वर्षांपूर्वी खचलेला आहे. त्याठिकाणी अवजड वाहतूकीने रस्ता अधिक खचून घाट मार्गच बंद होण्याची शक्यता आहे. तरीही या घाटातून अवजड वाहतूक सुरु आहे.
भुईबावडा घाटातून वाहतूक बंद झाल्यास वैभववाडी, कणकवली, राजापूर तालुक्याचा कोल्हापूरशी असलेला थेट संपर्क तुटण्याची भीती आहे. जिल्हातील अनेक रुग्ण उपचारासाठी कोल्हापूरला न्यावे लागते. तसेच अनेक विधार्थी शिक्षणासाठी कोल्हापूरला जात असतात. या सर्वांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे घाटातून होणारी अवजड हवातूक बंद करावी अन्यथा आंदोलन छेदण्याचा इशारा साठे यांनी दिला आहे.