मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित,ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण या प्रशालेमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ओझर विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी, पालक त्याचप्रमाणे शिक्षकांनी शाळेत ऑनलाइन संगणक शिक्षण सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याची संस्थेकडे मागणी करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे सुद्धा शाळेतील सर्व शिक्षकांनी, मुलांना ऑनलाइन संगणक शिक्षण सुरु करण्याची विनंती केली होती. त्यानुसार माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अल्पावधीतच मुंबई येथील रोटरी क्लब, मुलुंड यांच्यावतीने पाच नवीन संगणक व मुंबई येथील त्यांचे मित्र मुकेश केनिया यांच्याकडून पाच नविन संगणक संच असे एकूण दहा संगणक संच उपलब्ध करून दिले. हे संगणक संच सुस्थितीत राहण्यासाठी नवीन संगणक कक्षाची उभारणी नीलम अनिल शेलटकर यांच्या सौजन्याने शालेय समितीचे सदस्य विजय शेलटकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आली. नवीन संगणक संच व नवीन कक्ष यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचे ऑनलाइन संगणक शिक्षण मिळणार आहे. सदर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सुहास पेडणेकर, नीलम अनिल शेलटकर त्याचप्रमाणे विजय शेलटकर यांचे ओझर विद्यामंदिर परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी तथा सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त शामसुंदर पेडणेकर, माजी विद्यार्थी मंगेश वायंगणकर, सुरेश भोजने शालेय समिती अध्यक्ष, किशोर नरे, सदस्य विजय शेलटकर विजय कांबळी, जयराम कांबळी, विशाल राणे,शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव, साहा. शिक्षक अभय शेर्लेकर एन एस परुळेकर, शिवराम सावंत, पवार मॅडम, सर्व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक,माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षक प्रवीण पारकर यांनी, तर आभार प्रदर्शन सहा.शिक्षक पी. के. राणे यांनी केले.
