सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कॅश डिपॉझिट मशीन मध्ये बनावट चलनी नोटा डिपॉझिट केल्याच्या गुन्ह्यातील सहआरोपी निशिगंधा उमेश कुडाळकर ( वय 25, रा. पिंगुळी , ता कुडाळ ) हिचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी युक्तिवाद केला. 23 नोव्हेंबर 2023 रोजी बँक ऑफ इंडिया च्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये 3 हजार 200 रुपयांच्या बनावट चलनी नोटा बँक खात्यात भरण्यात आल्या होत्या. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निशिगंधा कुडाळकर हि सहआरोपी आहे. आरोपी निशिगंधा हिला 9 ऑगस्ट 2024 रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या निशिगंधा हिने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. आरोपी निशिगंधा हिचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे, आरोपी निशिगंधा हिचे कृत्य भारतीय अर्थव्यवस्थेस हानिकारक आहे.बनावट चलनी नोटा आहेत हे माहीत असूनही स्वतःच्या बँक खात्यात बनावट नोटा भरण्यासाठी दिल्या, जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव आणू शकते, खटला सुनावणी कामी फरार होईल आदी मुद्दे न्यायालयासमक्ष सरकारी वकील देसाई यांनी नमूद केले.सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी निशिगंधा कुडाळकर हिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.