वैभववाडी (प्रतिनिधी) : चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे साखरेची पोती भरलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक व क्लीनर या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात बुधवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास तिरवडे तर्फ खारेपाटण खिंड येथे घडला.
ट्रक चालक श्रीकृष्ण घनशाम नलावडे वय 45 रा. वेताळ बांबर्डे ता. कुडाळ हे आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये 200 पोती साखर भरून भुईबावडा घाट मार्गे कुडाळला जात होते.ट्रक तिरवडे खिंड येथे आला असता, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक गटारात पलटी झाला. दरम्यान क्लीनर योगेश विलास गवळी याने ट्रक पलटी होत असल्याचे लक्षात येताच त्याने ट्रक मधून उडी घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार शैलेश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुनर्वसन गावाठाणातील ग्रामस्थ अभय कांबळे, यशवंत कांबळे, यांनी धाव घेत जखमीना मदत करीत ट्रक चालक श्रीकृष्ण नलावडे याला प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे येथे दाखल केले.












