शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चा काढून महापालिकेसमोर आंदोलन
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सर्व रस्ते लवकरात लवकर दर्जेदार करावेत अन्यथा निवेदन न देता रस्त्यावर उतरून आरपारची लढाई करून उग्र आंदोलन छेडल जाईल, असा इशारा संजय पवार यांनी दिलाय. आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीन महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना शहरातील रस्त्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. रस्त्यांच्या कामात दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांना ब्लॅक लिस्ट करावं, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाल्यामुळं सर्वत्र खड्ड्यांच साम्राज्य पसरल. शासनाच्या नगरोत्थान योजनेतून कोल्हापुरातील १६ रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटी ३३ लाखांचा निधी उपलब्ध झालाय. सुरुवातीला यातील ५ रस्त्यांचं काम सुरू झालं होतं. मात्र, पावसाळ्यामुळं हे कामही अर्धवट राहिल आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरू. तरीही शहरातील रस्त्यात पडलेले खड्डे बुजवण्याकडं महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष झाल आहे. याच्या निषेधार्थ आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निषेध मोर्चा काढून महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भ्रष्ट अधिकारी, ठेकेदार आणि टक्केवारी घेणाऱ्यांवर कारवाई करावी अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना धारेवर धरण्यात आलं. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी येण्याला उशीर केल्यामुळं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी काही काळ गोंधळ घातल्यामुळं तणाव निर्माण झाला होता. त्यांनाही विविध सवाल करत, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, महेश उत्तुरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरलं.दरम्यान, कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर तसंच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि ठेकेदारांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करावं,अशा सूचना यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.तसंच सध्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांच्या पॅचवर्कचं काम सुरू करण्यात आलंय. नगरोत्थानमधील १०० कोटी ३३ लाखांच्या निधीतील रस्त्यांची कामं गणेशोत्सवानंतर चांगल्या पद्धतीनं केली जातील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी अवधूत साळोखे, राजू जाधव, विराज पाटील, राजू यादव, विशाल देवकुळे, मंजीत माने, प्रतिज्ञा उत्तुरे,रीमा देशपांडे, माधुरी जाधव, राजू सांगावकर, दिनेश साळोखे, सागर साळोखे, कमलाकर जगदाळे, दिनेश परमार, बंडा लोंढे, सुशील भांदिगरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.