शेतकरी सजग आणि अभ्यासू होण्यासाठी विशेष डेमो- प्रात्यक्षिकांचे आयोजन – अलंकार रावराणे
शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक सुविधा शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी, “भूमिपुत्र सेंद्रिय शेती शेतकरी गट” कटीबद्ध !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपला देश शेतीप्रधान देश आहे. गेल्या कित्येक वर्षात आपल्या पारंपारिक- नैसर्गिक शेतीला फाटा देत ,अधिकतम उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे उत्पादन वाढले. परंतु जनतेच्या आरोग्यावर त्याचा थेट दुष्परिणाम होऊन, विविध प्रकारच्या रोगांनी समाज त्रस्त झाला आहे. त्यामुळे पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि मेजर सुधीर सावंत यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी, सेंद्रिय खताचा वापर,त्यासाठी आग्रह- प्रात्यक्षिक आणि अभ्यास बैठका सुरू करण्यात, महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून आग्रह धरला आहे. त्यातून सुदृढ समाजाची पुनर्बांधणी शक्य आहे. असे मार्गदर्शन मार्केटिंग प्रतिनिधी सत्यवान राहणे यांनी केले.
फोंडाघाट भूमिपुत्र सेंद्रिय शेती शेतकरी गटाची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय जीवामृत कल्चरचे वाटप करण्यात आले. याचा वापर कसा करावा? प्रमाण काय वापरावे ? याचे अभ्यासपूर्ण विवेचन अक्षय परब यांनी करताना, उपस्थितांचे शंका समाधान केले. शासनाकडून येत्या तीन वर्षात गटातील शेतकऱ्यांना सजग करण्यासाठी, शासनाकडून येणाऱ्या सुविधा, विविध कल्चरचे वाटप करण्यासाठी बचत गट कटिबद्ध असल्याचे बचत गट प्रमुख आबू पटेल यांनी स्पष्ट केले.
कंपनीचे अध्यक्ष अलंकार रावराणे यांनी, बचत गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, याच परिसरात काजू- बोंडू प्रोसेसिंग युनिट निर्मिती होणार आहे.त्यासाठी सेंद्रिय काजू उत्पादनाच्या टॅगसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. शेवटी तृप्ती सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी परिसरातील तीन बचत गटातील शेतकरी बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.