नामस्मरण आणि विविध अध्यात्मिक- लोकाभिमुख- संस्कारक्षम कार्यक्रमांचा जागर !
लक्षणीय सप्ताहासाठी फोंडाघाट नगरी सज्ज ! आर.के. ग्रुप कडून “संगीत भजन स्पर्धा २०२४” चे आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश विसर्जनानंतर,ऐन महालयात– पंचमी ते एकादशी तथा २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान, चालू वर्षी, बाजारपेठेचे आदरस्थान श्री देव राधाकृष्ण मंदिरात “अखंड हरिनाम सप्ताह” चे आयोजन करण्यात आले आहे.त्याकरिता मंदिर संचालक व सदस्य तसेच बाल गोपाळ मंडळी या उत्सवासाठी सज्ज झाली असून, विविध अध्यात्मिक, प्रबोधनात्मक, मनोरंजन -भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मंदिर आणि संपूर्ण बाजारपेठेला धावती मनमोहक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. घटस्थापना, नित्य पुजा-अर्चा, जीवनविद्या मिशन तर्फे उपासना यज्ञ, हरिपाठ कलावती आई मंडळाचे भजन, गोरूले यांचे सुश्राव्य कथा- कीर्तन, वारकरी भजन, रात्री उशिरापर्यंत स्थानीक भजने तसेच विविध स्थानिक नेते पुरस्कृत डबलबारी,युवा- युवतींसाठी रेकॉर्ड डान्स आणि फनी गेम स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू, फुगड्या- नाच स्पर्धा अशा विविध उपक्रमांची रेलचेल या सप्ताहात असणार आहे .सलग दहाव्या वर्षी आर. के. ग्रुप, फोंडाघाट तर्फे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने तारीख २२ ते २४ सप्टेंबर रात्री आठ वाजता, तीन दिवशी जिल्ह्यातील नामवंत भजन मंडळांमध्ये “संगीत भजन स्पर्धा २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आर.के ग्रुप फोंडाघाट यांचेशी संबंधितानी संपर्क साधावा. तसेच भजन रसिकांनी- भाविकांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन मंदिर समिती आणि बालगोपाळ मंडळ फोंडाघाट तसेच आर. के.ग्रुप यांचे कडून करण्यात आले आहे.