खो-खो खेळाडूंच्या भवितव्यासाठी प्रयत्न करणार – अमित सामंत
जिल्हयात लवकरच मोठी खो-खो स्पर्धा
कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खो-खो खेळाला भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील. त्या दृष्टीने माझ्या अध्यक्षपदाचा उपयोग करेन असा विश्वास महाराष्ट्र खोखो असोसिएशनशी संलग्न दि अम्याच्युअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्गचे नूतन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदी निवड झाल्यांनतर कुडाळ येथे श्री. सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते. एका महिनाभरात खो खो पंच परीक्षा आणि निवडणुका झाल्यांनतर भव्य अशी खो खो स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत यांनी यांनी सांगितले.
महाराष्ट्र खोखो असोसिएशनशी संलग्न दि अम्याच्युअर खो-खो असोसिएशन सिंधुदुर्गची कार्यकारिणी सभा येथील मराठा समाज सभागृहात झाली. यावेळी नूतन अध्यक्ष अमित सामंत, सचिव संजय पेंडुरकर, खजिनदार दूर्वांक मेस्त्री, उपाध्यक्ष श्रीनाथ फणसेकर, बयाजी बुराण, सहसचिव अनिल आचरेकर, सदस्य महादेव गोसावी, क्रिस्टन रॉड्रिक्स, अनिल शेळके, पंकज राणे, तेजस्वी नाईक उपस्थित होते.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना समिती सामंत म्हणाले, महारष्ट्र खो-खो असोसिएशनचे राज्य सरचिटणीस संदीप तावडे यांच्या विनंतीवरून मी या संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. पण मी केवळ राजकीय खेळाडू नाही तर मी मैदानावरचा देखील खेळाडू आहे. खोखो, बास्केटबॉल, पॉवरलिफ्टिंग अशा खेळात आपण राज्यस्तरावर खेळ केलेला आहे. त्यामुळे खेळाडूंचे प्रश्न काय असतात याची आपल्याला पूर्ण माहिती आहे. त्याचा ऊपयोग या खोखोच्या खेळाडूंची संघटना बांधताना नक्कीच होईल असे अमित सामंत यांनी सांगितले. त्याच बरोबर खेळात राजकारण आणू नये या मताचा आपण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सिंधुदुर्ग जिल्हयात खोखोचे स्वरूप बदल्यांसाठी प्रयत्न करणार आहे. केवळ पाठबळ नसताना हा खेळ मागे राहत असेल तर या खेळाला पूर्ण पाठबळ देण्यासाठी या संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
प्रो कबड्डी लीग प्रमाणे आता प्रो खोखो लीग सुद्धा सुरु झाली आहे. त्या लीगमध्ये सुद्धा जिल्ह्यातील खेळाडू खेळावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी जे काही करावे लागेल ते पण नक्की करू. या पदाला आणि खोखो खेळाला, खेळाडूंना न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न कारेन असा विश्वास अमित सामंत यांनी यायला व्यक्त केला.
यावेळी बोलताना महाराष्ट्र खोखो असोसिएशनचे सरचिटणीस संदीप तावडे म्हणाले, खोखो खेळाडूंचे नोकरीतले प्रमाण जास्त आहे. त्यामुळे खेळाकडे करमणूक म्हणून न पाहता करियर म्हणून पाहण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात खेळाडू खूप आहेत पण त्यांना संधी मिळत नाही. त्या दृष्टीने चाचपणी करताना अमित सामंत यांचे नाव समोर आले. आणि त्यांची खेळाप्रती असलेली निष्ठा पाहून त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याना खोखो खेळाचीसुद्धा राज्यस्तरीय पार्श्वभूमी आहे, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात खोखोचा प्रचार आणि प्रसार नक्की होईल असा विश्वास श्री. तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. खेळामुळे नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळत असल्याने त्यादृष्टीने सुद्धा आमची संघटना प्रयत्न करेल असे श्री. तावडे यांनी सांगितले.
यावेळी संदीप तावडे यांच्या हस्ते अमित सामंत याना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सर्वानी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.