साळीस्ते बौद्धवाडी स्टॉपवर स्वखर्चाने उभारली प्रवासी निवारा शेड
स्व. बाळासाहेबांची शिकवण आचरणात आणली – सतीश गुरव
तळेरे (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा चे खारेपाटण संपर्कप्रमुख सतीश गुरव यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या दातृत्वाने साळीस्ते बौद्धवाडी येथे स्वखर्चाने प्रवासी निवारा शेड उभारून दिली. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा मूलमंत्र दिला आहे. साळीस्ते वासीयांनी प्रवासी निवारा शेड ची माझ्याकडे केलेली मागणी पूर्ण करून स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याची प्रतिक्रिया सतीश गुरव यांनी दिली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साळीस्ते गावातील बौद्धवाडी येथील एसटी थांब्यानजीक असलेली प्रवासी शेड कोलमडली होती. ऐन पावसाळ्यात येथे थांबणाऱ्या स्थानिक आणि बाहेरील ग्रामस्थ आणि प्रवाशांना प्रवासी शेड अभावी पावसात राहावे लागत असे. साहजिकच याचा त्रास ग्रामस्थांसह प्रवाशांना होत होता.ही प्रवासी निवारा शेड पूर्ववत उभारून मिळावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न करून पाहिले होते. मात्र केवळ शाब्दिक आश्वासनापलीकडे काहीच पदरात पडत नव्हते. अखेर ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खारेपाटण संपर्क प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्याकडे प्रवासी निवारा शेड बाबत आपली खंत व्यक्त केली. सतीश गुरव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ प्रवाशी शेड उभारणीसाठी लागणारे सिमेंट पत्रे, लोखंडी अँगल आदी सर्व साहित्य आणि कारागीर स्वखर्चाने पाठवून देत प्रत्यक्ष प्रवासी निवारा शेड बांधकामाला सुरुवात केली. सतीश गुरव यांच्याकडे मागणी करताच सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ सतीश गुरव यांनी प्रवासी निवारा शेड पूर्ववत बांधून दिली. ऐन पावसाळ्यात गुरव यांनी उभारलेल्या प्रवासी निवारा शेडमुळे वाहनांची वाट पाहत उभे राहणाऱ्या प्रवासी आणि ग्रामस्थांना पावसापासून संरक्षण मिळणार आहे. तसेच ऊन वाऱ्यापासूनही दिलासा मिळणार आहे. सतीश गुरव यांचे आभार मानतानाच गुरव यांनी दाखविलेल्या दातृत्वाबद्दल साळीस्तेवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.