लोखंडी डेस्क बेंच वितरणात मोठा भ्रष्टाचार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे शिवसेनेने छेडले आत्मक्लेश आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : समाज कल्याण विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघात वाटप केलेल्या लोखंडी डेस्क बेंच निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच या बेंचवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न टाकता त्यावर आमदार राणे यांचे नाव टाकण्यात आले. हा बाबासाहेबांचा अपमान असल्याचा आरोप करत उद्धवसेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेंच भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन छेडण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत समाज कल्याण विभागाच्यावतीने कणकवली विधानसभा मतदार संघात २५० दलित वस्तीसाठी २ हजार लोखंडी डेस्क बेंच वाटप करण्यात आले आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतची मागणी नसताना समाज कल्याण विभागाच्यावतीने आमदार नितेश राणेंच्या शिफारशी नुसार त्यासाठी अडीज कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र ३५०० किंमतीच्या असलेल्या लोखंडी डेस्क बेंचसाठी १२ हजार ५०० दाखवून प्रत्येक बेंचमागे ९ हजार रुपयांचा ज्यादा खर्च दाखवण्यात आलाआहे, त्यामुळे प्रत्येकी ९ हजार प्रमाणे सुमारे दीड कोटींचा भ्रष्टाचार लोखंडी डेस्क बेंच वाटपात करण्यात आला आहे. तसेच डेस्क बेंचवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न टाकता आमदार नितेश राणे यांचे नाव टाकण्यात आले असून हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषाचा अवमान केला आहे. डेस्क बेंच हे पावडर कोटेड नाही त्यांना लगेच गंज पकडत असून दलित वस्तीत वगळून सार्वजनिक जागेत हे डेस्क बसवले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ तसेच बेंच वाटपातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आज उद्धवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन करून सिंधुदुर्ग समाज कल्याण विभागाचे आयुक्त आणि सहआयुक्त यांचा देखील या भ्रष्टाचारात हात आहे. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,ज्या गावांमध्ये बेंच देण्यात आले आहेत ते दलित वस्ती मध्ये न बसविता इतरत्र बसविण्यात आले आहेत, त्यामुळे संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना प्रमुख सुशांत नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!