वैभववाडी तालुका धनगर समाज दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
वैभववाडी (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य तितक्या लवकर आपले ध्येय निश्चित करावे. ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकष्टा करावी. यश निश्चितपणे प्राप्त होईल. असे प्रतिपादन कवी साहित्यिक तथा मुख्याध्यापक चेतन बोडेकर यांनी केले.
वैभववाडी तालुका धनगर समाज सेवा संस्था मुंबई यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ वैभववाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी चेतन बोडेकर बोलत होते.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग शेळके समाज नेते लक्ष्मण शेळके समाज उन्नती मंडळाचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग काळे नगरसेविका रेवा बावदाने, कार्याध्यक्ष शंकर आडुळकर, सचिव आकाराम गुरखे,जनार्दन बोडेकर, प्रभाकर कोकरे, अजित आडुळकर, दाजी बर्गे गंगाराम शिंदे जयसिंग शेळके आदी समाज संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोडेकर पुढे बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपली आवड, अंगभूत क्षमता यानुसार केवळ चाकोरीबद्ध शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता विविध क्षेत्रांत भविष्य शोधावे. बदलत्या परिस्थतीनुसार कला, वाणिज्य, नोकरी, उद्योग ,अभिनय, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, पत्रकारिता, आधुनिक शेती, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्र याकडे डोळसपणे पाहावे. याच काळात व्यसनापासून व अन्य वाम मार्गापासून स्वतः चा बचाव करावा व सामाजिक बांधिलकी कायम ठेवत सद्गुणांची साथ धरावी.
या कार्यक्रमात समाजातील ग्रामपंचायत सदस्य नवनियुक्ती पोलीस पाटील व दहावी बारावी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.