आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात केला पोलखोल

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय सुरु होऊन दिड वर्ष झाले तरी रुग्णालयात झाल्या फक्त १५ प्रसूत्या

वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, वैद्यकीय यंत्र सामग्री,उपकरणे पुरविण्यातही दिरंगाई

कुडाळ (प्रतिनिधी) : सरकारच्या धोरणानुसार महिलांसाठी विशेष रुग्णालय असलेले कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल रुग्णालय सुरु होऊन दिड वर्ष झाले तरी केवळ मागच्या १५ दिवसात फक्त १५ प्रसूत्या या रुग्णालयात झाल्या आहेत. आवश्यक प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ञ, तसेच वैद्यकीय यंत्र सामग्री उपकरणे देखील उपलब्ध करण्यात आली नाहीत. या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा पोलखोल आज आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात केला. महिला व बाल रुग्णालयात आवश्यक असलेले डॉकटर आणि भूलतज्ञ किती दिवसात नेमणार? आणि वैद्यकीय यंत्र सामग्री, उपकरणे उपलब्ध करून प्रत्यक्षात कधीपर्यंत सुरु करणार? असे प्रश्न सभागृहात आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकार आणि आरोग्य मंत्र्यांना विचारले.

आ.वैभव नाईक म्हणाले, कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे बांधकाम २०१९ मध्ये पूर्ण झाले. २०२० मध्ये या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केले होते. हॉस्पिटलचे कामकाज सुरु करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर ६९ कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले. मात्र तोपर्यंत कोणत्याही डॉक्टरची नेमणूक त्याठिकाणी झाली नव्हती. डॉक्टर उपलब्ध नसल्याने कोणतीही वैद्यकीय सेवा न देताही या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले. त्याबाबत वारंवार मागणी केल्यानंतर एक डॉकटर देण्यात आला. आता रुग्णालय सुरु होऊन दिड वर्ष झाले असे असतानाही गेल्या १५ दिवसात फक्त १५ प्रसूत्या या जिल्हा महिला रुग्णालयात झाल्या आहेत. प्रसूतीसाठी अद्याप त्याठिकाणी भूलतज्ञ उपलब्ध नाहीय. आणि केवळ एकच स्त्री रोग तज्ञ नेमले आहेत ते देखील आजारी असल्याने उपलब्ध नाहीत. खास महिलांसाठी असलेल्या या रुग्णालयात महिलांनाच आरोग्य सेवा मिळत नाहीत. विशेष म्हणजे हॉस्पीटल सुरु झाले, कर्मचारी नेमले तरी वैद्यकीय यंत्र सामग्रीची, उपकरणे अदयाप उपलब्ध नाहीत. या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा पोलखोल आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात केला. तसेच महिला व बाल रुग्णालयात आवश्यक असलेले डॉकटर आणि भूलतज्ञ किती दिवसात नेमणार? आणि वैद्यकीय यंत्र सामग्री, उपकरणे उपलब्ध करून प्रत्यक्षात कधीपर्यंत सुरु करणार? असे प्रश्न सभागृहात आ. वैभव नाईक यांनी सरकार आणि आरोग्य मंत्र्यांना विचारले.

महिला व बाल रुग्णालयात कायम स्वरूपी भूलतज्ञ उपलब्ध नसल्याने तसेच आवश्यक उपकरणे उपलब्ध करण्यात आली नसल्याने याठिकाणी खूप कमी प्रमाणात प्रसूत्या झाल्या आहेत. कुडाळ ग्रामीण रुग्णालयात यापूर्वी महिन्याला १०० ते १२० प्रसूत्या होत होत्या. त्याप्रमाणेच गरीब कुटुंबातील महिलांच्या जास्तीत जास्त प्रसूत्या महिला रुग्णालयात व्हाव्यात यासाठी आवश्यक सुविधा पुरविणार का अशी विचारणा आ.वैभव नाईक यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!